News Flash

‘वंबआ’मुळे काँग्रेस विजयापासून ‘वंचित’

विधानसभा निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत काँग्रेसने भाजपला जोरदार लढत दिली.

|| नितीन पखाले

विधानसभा निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत काँग्रेसने भाजपला जोरदार लढत दिली. बंडखोरी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमदेवारांमुळे झालेले मतविभाजन भाजपच्या पथ्यावर पडून काँग्रेसला अपेक्षित असलेल्या तीन जागा गमवाव्या लागल्या. मात्र, भाजपला जिल्हा मुख्यालयात काँग्रेससोबत कराव्या लागलेल्या संघर्षांतून भाजपनेही धडा घ्यावा, असा कौल मतदारांनी दिला.

यवतमाळ, आर्णी, राळेगाव येथील काँग्रेसची जागा वंचित बहुजन आघाडीच्या उमदेवारीमुळे भाजपच्या ताब्यात गेली, अशी चर्चा आता काँग्रेसच्या गोटात सुरू आहे. या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा पुनरुच्चार काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

यवतमाळ येथील काँग्रेसचे उमदेवार बाळासाहेब मांगुळकर यांनी ७८ हजार १७२ आणि वंचित बहुजन आघाडीचे उमदेवार योगेश पारवेकर यांना सात हजार ९३० मते मिळाली. येथे मांगुळकर यांचा अवघ्या दोन हजार २५३ मतांनी पराभव झाला. राळेगाव मतदारसंघातही वंचितचे माधव कोहळे यांनी १० हजार ७०५ मते घेतली. येथे काँग्रेसचे वसंत पुरके यांचा नऊ हजार ८७५ मतांनी पराभव झाला.

आर्णी मतदारसंघात वंचितचे उमेदवार निरंजन मसराम यांनी १२ हजार २५३ मते घेतली आणि येथे काँग्रेसचे शिवाजीराव मोघे अवघ्या तीन हजार १५३ मतांनी पराभूत झाले, हे विशेष. काँग्रेसच्या या तिन्ही उमदेवारांचे पराभव वंचितच्या उमेदवारांमुळे झाल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. ‘वंचित’मुळे काँग्रेसचे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया या संदर्भात बोलताना माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी’ टीम असून भाजपच्या हिताचेच राजकारण करते, असे पुरके म्हणाले. काँग्रेस, राकाँ या पक्षांची वंचितसोबत आघाडी झाली असती तर विदर्भात काँग्रेसच्या जागा आणखी वाढल्या असत्या. वंचितमुळेच काँग्रेसला पराभवास सामोरे जावे लागले, हे खरे असले तरी काँग्रेसही मेहनत घेण्यास कमी पडली. आम्ही आमच्या चुका शोधू आणि सुधारू, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. वझाहत मिर्झा यांनी व्यक्त केले.

वणी आणि राळेगाव या मतदारसंघात वंचित फॅक्टर सोबतच बंडखोरांमुळेही काँग्रेसला जागा गमवावी लागली. वणी येथे बहुरंगी लढत नेहमीच काँग्रेसला फायद्याची ठरते. त्यामुळे येथील काँग्रेस उमेदवार वामनराव कासावार बऱ्यापैकी निश्चिंत होते. मात्र येथे वंचितसोबतच शिवसेना बंडखोर, अपक्ष उमेदवारांच्या मतविभाजनाचा फटका थेट काँग्रेसला बसला. उमेरखेडमध्येही अशीच परिस्थिती झाली. वंचितसोबतच बंडखोराचा फटका काँग्रेस उमदेवार विजय खडसे यांना बसला.

राहुल गांधींचा अपवाद वगळता काँग्रेसची एकही मोठी सभा जिल्ह्यत झाली नाही. जिल्ह्यतील मतदारांनी यावेळी जातीय समीकरणे उधळून लावल्याने या मतांचे विभाजन करण्यात काँग्रेस अपयशी ठरली. दिल्लीत आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने विकासासाठी आपल्याही मतदारसंघात याच पक्षाला निवडून दिले पाहिजे ही मानसिकता प्रकर्षांने आढळली. त्याचाच फायदा महायुतीला सहा मतदारसंघात झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 3:06 am

Web Title: vidhan sabha election congress vba akp 94
Next Stories
1 अमरावतीत महायुती का गारद झाली?
2 विकासकामांच्या संथगतीमुळे मतदारांचा नकार
3 वाडय़ातील फटाका व्यावसायिकांना मंदीचा फटका
Just Now!
X