राजकीय पक्षांना महिला नेतृत्वाचा विसर; नालासोपाऱ्यात एक अपक्ष

एकीकडे राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण द्यावे याबाबत चर्चा होत असतानाच दुसरीकडे महिलांना उमेदवारी देण्यात मात्र सर्वच राजकीय पक्ष उदासीन असल्याचे दिसून येते. पालघर जिल्ह्यात सहा मतदारसंघांमध्ये एकूण ५३ उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये केवळ एकच महिला उमेदवार आहे. नालासोपारा मतदारसंघात विजया समेळ या महिला उमेदवाराने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

पालघर जिल्ह्यात डहाणू व विक्रमगड मतदारसंघांत प्रत्येकी १०, पालघर मतदारसंघात पाच, बोईसर मतदारसंघात आठ, नालासोपाऱ्यात १४ तर वसई मतदारसंघात सहा उमेदवार निवडणुकीच्या आखाडय़ात आहेत. मात्र यापैकी महिला उमेदवार आहे केवळ नालासोपारा मतदारसंघात. या मतदारसंघातील १४ उमेदवारांपैकी एक आहेत अपक्ष उमेदवार विजया समेळ. मात्र अन्य कोणत्याही पक्षाने सहाही मतदारसंघांमध्ये महिला उमेदवार दिलेला नाही.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी विरार-वसईच्या माजी महापौर प्रवीणा ठाकूर (बहुजन विकास आघाडी), पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा थेतले (भाजप), तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैदेही वाढाण (शिवसेना) यांनी अनुक्रमे वसई, विक्रमगड व डहाणू विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र पक्षाचे आदेश, वरिष्ठांच्या सूचना विचाराधीन घेऊन या तिन्ही महिलांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याचा भाग असलेल्या या परिसरातून ताराबाई वर्तक आणि मनीषा निमकर या महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. १९८०मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने ताराबाई वर्तक वसई मतदारसंघातून निवडून आल्या, तर १९९५, १९९९ आणि २००४मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर मनीषा निमकर या पालघर मतदारसंघातून निवडून आल्या. या दोन्ही महिलांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा लाभ घेतला आहे.