गीता जैन यांचा वचननाम्यातून नरेंद्र मेहता यांच्यावर निशाणा

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नरेंद्र मेहता, काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन आणि भाजपच्या बंडखोर गीता जैन यांनी आपापले वचननामे प्रसिद्ध केले आहेत. या सर्वाच्या जाहीरनाम्यांमधून विकासकामे आणि मूलभूत सोयीसुविधांवरच भर देण्यात आले आहेत.

काँग्रेसचे मुजफ्फर हुसेन यांनी विद्यमान आमदारांनी गेल्या निवडणुकीत दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप करून मीरा-भाईंदर शहरासाठी आपण आजवर केलेल्या कामांची माहिती आपल्या वचननाम्यात दिली आहे. हुसेन यांनी आपण आमदार झाल्यास दहिसर टोलनाक्यातून मुक्ती देणे, मीरा रोड साठी रेल्वेची स्वतंत्र उपनगरी गाडी सुरू करणे, सूर्या धरण पाणीयोजना त्वरित कार्यान्वित करणे, लघुउद्योगांना चालना देणे, मेट्रो प्रकल्प जलद गतीने राबवणे. धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी चटई क्षेत्रफळ वाढवून पुनर्बाधणी प्रकल्पांना चालना देणे, महापालिकेचे रुग्णालय शासनाकडे त्वरित हस्तांतर करून सुसज्ज रुग्णालय देणे आदी कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

मेहता यांनी आपल्या वचननाम्यात गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा समावेश केला आहे. यात प्रामुख्याने ७५ दशलक्ष लिटर पाणी योजनेची पूर्तता, सुसज्ज क्रीडासंकुल, भाजी बाजार, अतिरिक्त तहसीलदार कार्यालय, पोलीस आयुक्तालय मान्यता, मीरा रोड रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण आदी कामांचा समावेश आहे.

गीता जैन यांनी आपल्या वचननाम्यात पर्यावरण संवर्धनाच्या नियमांची अंलबजावणी लागू करणे, दहिसर टोलनाका हटवणे, परिवहन सेवेचे विस्तारीकरण, महामार्गावर पादचारी पुलाची निर्मिती, वाहनतळ, मच्छीमारांसाठी सरकारी योजना लागू करणे, जर्मन तंत्रानुसार घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे आदी मुद्दय़ांचा समावेश केला आहे. मात्र जैन यांनी आपला वचननामा प्रकाशित करताना घेतलेली शपथ मात्र चर्चेचा विषय बनली आहे. या शपथेच्या आडून गीता जैन यांनी भाजपचे नरेंद्र मेहता यांनाच लक्ष्य केले असल्याचे बोलले जात आहे. नऊ  बाबींवर या वचननाम्यात शपथ घेण्यात आली आहे. यात मी स्वत:चे खासगी रुग्णालय न बनवता जनतेसाठी रुग्णालय बनवेन, स्वत:च्या कमाईसाठी शाळा न काढता सामान्य नागरिकांसाठी शाळा सुरू करेन, स्वत:चा आलिशान क्लब न बनवता सामान्यांसाठी क्रीडा संकुल बनवेन, असे म्हटले आहे. या मुद्दय़ांवरून जैन यांनी नरेंद्र मेहता यांचे नाव न घेता त्यांच्यावरच निशाणा साधला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

आमदार नरेंद्र मेहता यांनी मात्र गीता जैन यांनी जाहीरनामा प्रकाशित करताना निव्वळ स्टंटबाजी केली असल्याची टीका केली आहे. आमच्यावर निष्क्रियतेचा आरोप करण्याआधी स्वत: कोणती विकासकामे केली आहेत याचा हिशोब द्यावा, असा प्रतीटोला मेहता यांनी लगावला आहे.