News Flash

विकासकामांच्या संथगतीमुळे मतदारांचा नकार

पालघर जिल्ह्य़ात युतीतर्फे शिवसेना चार तर भाजपाने दोन जागांवर निवडणूक लढवली होती.

|| नीरज राऊत

निष्क्रियता, जनसंपर्काअभावी आमदारांची ‘घरवापसी’ : – पालघर जिल्ह्य़ातील दोन विद्यमान आमदार व माजी पालकमंत्री यांच्या चिरंजीवांचा पराभव विधानसभा निवडणुकीत झाला असून नव्याने निर्माण झालेल्या जिल्ह्य़ाचा विकास साधण्यास ही मंडळी अकार्यक्षम ठरल्याची पोचपावतीच मतदानाच्या निकालावरून दिसून आली आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी दाखवलेली निष्क्रियता, विकास कामांकडे झालेले दुर्लक्ष, लोक संपर्काचा अभाव पक्षांमधील अंतर्गत नाराजी ही पराभवाची प्रमुख कारणे असल्याचे दिसून आले आहे.

पालघर जिल्ह्य़ात युतीतर्फे शिवसेना चार तर भाजपाने दोन जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत पालघरच्या जागेच्या रूपाने शिवसेनेला एकमेव विजय संपादन करता आला व उर्वरित सर्व पाच जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत मुख्यमंत्री यांनी डहाणू, जव्हार येथे प्रचार सभा घेतली होती. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोर, नालासोपारा, वसई या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या होत्या. असे असताना या सर्व ठिकाणी युतीच्या उमेदवारांचा पराभव झाला असून मतदारांनी युतीतर्फे देण्यात आलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवला नसल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले आहे.

जिल्ह्य़ाची निर्मिती झाल्यानंतर अखेरच्या दोन वर्षांमध्ये कुपोषण निर्मूलनासाठी ठोस पावले उचलली गेली असली तरी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देणे या समस्यांवर युती सरकार अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.

खासदारांची पंचाईत

२०१६ पर्यंत काँग्रेस पक्षातून उमेदवारी करणाऱ्या राजेंद्र गावित यांनी २०१८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून विजयश्री संपादन केला होता. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेत खासदारपदी विजयी झाले होते.

सध्या जिल्ह्य़ात शिवसेना-भाजपामध्ये मतभेद असताना कोणासाठी व कुठे प्रचार करावा हा प्रश्न खासदारांना समोर  होता. त्यामुळे त्यांनी  औपचारिकता दाखवण्यापुरताच प्रचार केल्याचे युतीच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.

विक्रमगड

विक्रमगड मतदारसंघातून विद्यमान आमदार व माजी पालकमंत्री विष्णू सवरा यांचे चिरंजीव डॉ. हेमंत सवरा यांचा पराभव झाला. अगदी पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांनी आघाडी घेतली होती व अखेपर्यंत ती कायम राखली.  विष्णू सवरा यांच्या विजयानंतर मतदारसंघातील त्यांच्या संपर्काबाबत तसेच झालेल्या विकास कामांविषयी कमालीची नाराजी सर्वत्र दिसून आली. या अकार्यक्षमतेमुळे तसेच अंतर्गत वाद-विवाद यामुळे पक्ष संघटना खिळखिळी झाली असल्याने त्याचा फटका भाजपाच्या उमेदवाराला बसला. स्थानिक नेत्यांवर एकीकडे वरिष्ठांचा विश्वास नसल्याचे जाणवत होते तर स्थानिक मंडळी प्रदेश पदाधिकाऱ्यांविषयी नाराजी उघडपणे दिसून आली.

पालघर

पालघरमधली निवडणूक तुलनात्मक एकतर्फी झाली. शिवसेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत पक्षांतर केले होते. मात्र त्यांनी चौथ्या दिवशी नाटय़मयरीत्या उमदेवार माघार घेऊन घरवापसी केली. काँग्रेसकडे प्रचार राबवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नव्हती, तसेच आर्थिक बाजूवर आघाडी उमेदवारांवर मर्यादा आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडी व माकप यांची पालघर मतदार संघात मर्यादित ताकद असल्याने त्याचा फटका काँग्रेसचे उमेदवार यांना बसला. शिवसेना सहजपणे विजयी झाली.

बोईसर

दोन वेळा आमदार राहिलेल्या विलास तरे यांच्या निष्क्रियतेबद्दल या निवडणुकीच्या सुरुवातीपासून चर्चा होतीच. आपल्याला विकासकामे करून दिली नाही अशी सबब पुढे करून त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले. बहुजन विकास आघाडीमध्ये असताना ज्या शिवसैनिकांच्या विरुद्ध त्यांनी भूमिका घेतली त्याच पक्षात त्यांनी पक्षांतर केल्याने सफाळे भागातील शिवसैनिकांमध्ये नाराजी उफाळून आली. तरे यांच्या पक्षांतरामुळे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते नाराज होते.या बंडखोर उमेदवाराच्या प्रचाराकरिता कोकण विभाग संघटन मंत्र्यांचा भाजपाचे राज्य स्तरावरील पदाधिकारी सहभागी झाल्याने सेना विरुद्ध भाजप असा सामनादेखील बोईसर या भागात रंगला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 1:23 am

Web Title: vidhan sabha election mla guardian minister akp 94
Next Stories
1 वाडय़ातील फटाका व्यावसायिकांना मंदीचा फटका
2 मासेमारी बोटी परतल्या!
3 आनंददायी
Just Now!
X