News Flash

प्रदेश पातळीवरील लादलेले निर्णय नगर जिल्ह्य़ात भाजपच्या अंगलट

विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्य़ात हवेत उडय़ा घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने अखेर जमिनीवर उतरावे लागले.

 

|| मोहनीराज लहाडे

विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्य़ात हवेत उडय़ा घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने अखेर जमिनीवर उतरावे लागले. पक्षाचे आव्हान राष्ट्रवादीने थोपवले. पाचहून संख्याबळ घटले आणि अवघ्या तीन जागांवर भाजपला समाधान मानावे लागले. जे निवडून आले तेही बाहेरहून पक्षात आलेले आहेत. अर्थात उमेदवारी देतानाच निष्ठावान भाजपचा चेहरा शोधावा लागत होता. भाजप-शिवसेना युतीमध्येही आता विस्कळीतपणा आलेला आहे. उलट जिल्ह्य़ात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी अधिक घट्ट झालेली आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून लादलेले निर्णय जिल्ह्य़ात आंगलट आले. त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आले. जिल्ह्य़ातील भाजपचे जुने जाणते पदाधिकारी आता मत व्यक्त करू लागले आहेत.

लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करायची की नाही, यापासूनच त्याची सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांचा भाजप प्रवेश झाला. विखे यांच्या प्रवेशास जिल्हा संघटनेतील पदाधिकारी व काही आमदारांचा विरोध होता. तो मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या लक्षात आणून देण्यात आला होता. डॉ. विखे यांचा लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाला. विखे यांच्यामुळे जिल्ह्य़ात भाजपची ताकद वाढल्याची हवा निर्माण झाली. ही ताकद पक्षाची, युतीची असल्याचा भ्रम तयार झाला. त्या आधारावर पक्षाने जिल्ह्य़ात आठ जागा लढवल्या. परंतु पक्षातील भ्रम विधानसभा निवडणुकीत फोल ठरला.

जिल्ह्य़ातून पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेशी युती करण्याच्या विरोधात मत नोंदवले होते. जिल्ह्य़ात आता युतीत पूर्वीसारखा एकसंधपणा राहिला नाही. स्थानिक पातळीवर भाजप व शिवसेना दोघेही सोयीनुसार काँग्रेस व राष्ट्रवादीशी जवळीक ठेवू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध झुंजतात, त्यातून निर्माण झालेली कटुता वेळोवेळी प्रकटते, त्याचे परिणाम ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत त्याचेच चित्र उमटले.

भाजपने सर्वेक्षण करून कोणत्या जागा लढवायच्या, कोण उमेदवार द्यायचे याचा निर्णय घेतला. पक्षातील पदाधिकाऱ्याच्या माहितीनुसार या सर्वेक्षणात जिल्ह्य़ातील चार जागा धोक्यात असल्याचा इशारा होता. कोपरगाव, कर्जत-जामखेड, राहुरी व श्रीगोंद्याच्या जागेचा समावेश होता. अकोल्यातील जागेसाठी जिल्ह्य़ातून पक्षातीलच डॉ. किरण लहामटे, राहुरीसाठी सत्यजित कदम, कोपरगावसाठी आशुतोष काळे यांच्या नावाचा आग्रह धरला गेला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अकोल्यात वैभव पिचड यांना प्रवेश देण्यात आला. अडचणीत वाटणाऱ्या जागांसाठी मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या, रसद पुरवली गेली, मात्र मतदारांत असलेली उमेदवारांबद्दलची नाराजी दूर होऊ शकली नाही. त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसले.

गुजरातची टीम व गिरीश महाजन यांची भेट

निवडणूक प्रचार काळात भाजपने गुजरातमधील ३५ पदाधिकाऱ्यांची टीम नगर जिल्ह्य़ात पाठवली होती. प्रत्येक मतदार संघातील अहवाल गुजरात प्रदेशाध्यक्षांमार्फत थेट मुख्यमंत्री वॉररूमला पाठवला जात होता. जिल्ह्य़ातील परिस्थिती कळवली जात होती. विखे समर्थक सक्रिय नसल्याचे, विरोधी काम करत असल्याच्या, मतदार संघात विरोधी वातावरण निर्माण होत असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्यावर मतदानाला चार दिवस राहीले असताना राहिले असताना संकटमोचक गिरीश महाजन गुपचुप शहराजवळील विळद घाटात आले होते, तेथे काही आमदार व पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती. ही भेट झाल्यानंतर महाजन लगेच निघून गेले. मात्र पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून त्याची दखल घेतली गेल्याचे काहीच लक्षणे नंतर दिसून आली नाहीत. त्यामुळे प्रदेश संघटनमधील पदाधिकाऱ्याच्या निदर्शनासही ही बाब आणून दिली गेली. परंतु काहीच हालचाल झाली नाही. स्थानिक संघटनेला विचारात न घेतल्याचा परिणाम निवडणुकीत दिसला, याकडे लक्ष वेधले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 3:20 am

Web Title: vidhan sabha election region level imposed decisions bjp akp 94
Next Stories
1 बीडमध्ये संदीप क्षीरसागर ‘जायंट किलर’!
2 लोकसभेतले हेवेदावे विधानसभेत मावळले,
3 वर्धा जिल्ह्य़ात भाजप सरस, सेना शून्य
Just Now!
X