एजाजहुसेन मुजावर

एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून दहा साखर कारखानदार नशीब अजमावत आहेत. यात राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचे तीन, भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक याप्रमाणे साखर कारखानदार लढत   देत आहेत. पंढरपूर व करमाळ्यात दोन साखर कारखानदार एकमेकांविरूध्द थेट कडवी झुंज देत आहेत. साखर कारखानदारीशी जुना संबंध असलेल्या मोहिते-पाटील कु टुंबीयांपैकी कोणीही विधानसभा निवडणुकीत उभे नाहीत.

करमाळा येथे राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल होऊन विधानसभा लढविणाऱ्या रश्मी बागल यांच्या ताब्यात दोन सहकारी साखर कारखाने आहेत. आदिनाथ व मकाई या दोन्ही साखर कारखान्यांची परिस्थिती वाईट असून दोन्ही कारखाने बंदच आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे उभे आहेत. त्यांचा माढा तालुक्यात म्हैसगाव येथे खासगी स्वरूपाचा विठ्ठल साखर कारखाना आहे. शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केलेले विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा साखर कारखाना नाही. पंढरपूर मतदारसंघात भाजप पुरस्कृत सुधाकर परिचारक व राष्ट्रवादीचे भारत भालके हे दोन्ही साखर कारखानदार एकमेकांविरूध्द कडवी झुंज देत आहेत. ८४ वर्षांचे परिचारक यांचा साखर कारखानदारीत गाढा अनुभव असून त्यांच्या वर्चस्वाखाली माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे पांडुरंग सहकारी साखर कारखाना आहे. तसेच त्यांचे पुतणे उमेश परिचारक यांचा मंगळवेढय़ात खासगी साखर कारखाना आहे. तर गेली दहा वर्षे आमदार राहिलेले आमदार भारत भालके यांचा पंढरपुरात गुरसाळे येथे विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे.

बार्शीत शिवसेनेचे दिलीप सोपल यांच्याशी संबंधित आर्यन साखर कारखाना असून गेली काही वर्षे बंदच आहे. त्यांच्या विरोधात उभे राहिलेले भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांचा साखर कारखाना नाही. मात्र त्यांच्या खासगी तत्त्वावर कृषिउत्पन्न बाजार समिती व दूध प्रकल्प असे प्रकल्प आहेत. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचे लोकमंगल नावाचे दोन साखर कारखाने आहेत. तर अक्कलकोटमध्ये काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचा त्यांच्या गावी दुधनीजवळ मातोश्री लक्ष्मी शुगर नावाचा खासगी साखर साखर कारखाना आहे.

माढय़ात राष्ट्रवादीचे उमेदवार, आमदार बबनराव शिंदे हेदेखील बडे साखर कारखानदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कुटुंबीयांचे तब्बल सहा साखर कारखाने आहेत. त्यापैकी विठ्ठलराव शिंदे या नावाचा केवळ एकच सहकारी साखर कारखाना आहे. उर्वरित सर्व पाच कारखाने खासगी मालकीचे आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांच्या मालकीचे दोन खासगी साखर कारखाने आहेत. माळशिरस मतदारसंघात मोहिते-पाटील विरोधक समजले जाणारे राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचाही साखर कारखाना आहे. सध्या मात्र तो बंद आहे.

बहुतेकांनी उसाची देयके थकविली

सोलापुरात विधानसभा निवडणुकीसाठी यांना बहुसंख्य कारखानादारच मते मागत आहेत. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे या दहा साखर कारखानदार उमेदवारांपैकी एखाद दुसरा अपवाद वगळता बहुसंख्य उमेदवारांच्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाची देयके वेळेवर न देता थकविली आहेत.