आसाराम लोमटे

‘खासदार विरुद्ध आमदार’ संघर्षांला पूर्णविराम! :- तब्बल ८० हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सेनेच्या आजवरच्या विजयाच्या इतिहासात आपला विक्रम प्रस्थापित केला असला, तरी या निवडणुकीत ‘खासदार विरुद्ध आमदार’ या संघर्षांलाही पूर्णविराम मिळाला असून तो मावळल्याचे चित्र दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर खासदार संजय जाधव आणि राहुल पाटील यांच्यात वाढलेली दरी विधानसभा निवडणुकीने सांधली आहे.

गेल्या ३० वर्षांत परभणीची विधानसभा शिवसेनेने केवळ धार्मिक ध्रुवीकरणावरच जिंकलेली आहे. मुस्लीमबहुल असलेल्या या मतदार संघात शिवसेनेमार्फत सातत्याने ‘खान हवा की बाण’ असा प्रचार केला जातो. या निवडणुकीत  शिवसेनाविरोधी मतांचे एवढे तुकडे झाले  की शिवसेनेला असा वाद उपस्थित करण्याची आवश्यकताच भासली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या आजवरच्या राजकीय इतिहासात यंदाची विधानसभा निवडणूक वेगळी ठरली. नेहमीच मुस्लिमांचा बागुलबुवा दाखवत निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेने या वेळी पहिल्यांदाच विकासाची भाषा केली.

१९९० साली हनुमंत बोबडे यांनी काँग्रेसच्या शमीम अहमद खान यांचा ११ हजार ५६८ मतांनी पराभव केला. १९९५ च्या निवडणुकीत तुकाराम रेंगे यांची लढत पुन्हा शमीम अहमद खान यांच्याशी झाली. या निवडणुकीत त्यांनी १९ हजार ३५४ मतांनी खान यांचा पराभव केला. १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या लियाकत अन्सारी यांच्याविरुद्ध ७२१९ मतांची आघाडी घेत रेंगे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. २००४ च्या निवडणुकीत अशोक देशमुख यांचा तर २००९ च्या निवडणुकीत विखार अहमद खान यांचा पराभव करीत खासदार जाधव यांनी दोन वेळा विजय संपादन केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. राहुल पाटील यांनी ‘एमआयएम’च्या सज्जूलाला यांचा २६ हजार ५२६ मतांनी पराभव करीत विजय संपादन केला. दुसऱ्यांदा त्यांचे हे मताधिक्य तब्बल तिपटीहून अधिक वाढले.   या विधानसभा निवडणुकीला पक्षांतर्गत वादाचीही एक किनार होती. खासदार जाधव आणि आमदार डॉ. पाटील यांच्यातले राजकीय वैर अगदी या विधानसभा निवडणुकीच्या आधीपर्यंत होते. अनेकदा या वादाची ठिणगी यापूर्वी पडली होती  एक वर्षांपूर्वी दोघांचेही समर्थक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत समोरासमोर भिडले होते. महापालिका निवडणुकीत आमदार पाटील यांच्या समर्थक उमेदवारांना दोघांमधील वादाचा फटका बसला होता . दोघांमधील ही कटुता संपविण्यासाठी थेट मातोश्रीवरून समझोत्याचेही प्रयत्न झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोघांनाही साखर भरवली, पण त्याचा काहीच परिणाम त्या वेळी दिसून आला नव्हता. लोकसभा निवडणुकीनंतर ‘खासदार विरुद्ध आमदार’ हा संघर्ष आणखी टोकाला गेला होता. लोकसभेला आमदारांनी खासदारांच्या विरोधात काम केले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. परभणी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना तब्बल ३० हजारांचे मताधिक्य होते. ही बाब खासदार समर्थकांनी जास्तच मनावर घेतली. खासदार जाधव यांच्या विजयी मिरवणुकीत आमदार डॉ. पाटील व त्यांचे समर्थक कोणीच सहभागी नव्हते. विधानसभा निवडणुकीसाठी आमदार डॉ. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा खासदार जाधव यांची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली होती. खासदारांच्या अनुपस्थितीची दखल त्या वेळी सर्वच प्रसिद्धिमाध्यमांनी घेतली होती. त्यानंतर मात्र खासदार जाधव यांनी एका पत्रकार बठकीत आपण कायम भगव्याशी एकनिष्ठ असून विधानसभा निवडणुकीत सुद्धा तेवढय़ाच निष्ठेने काम करू असे स्पष्ट केले. ‘त्यांनी’ जसे लोकसभेला केले तसे मी करणार नाही, असा टोला आमदार पाटील यांचे नाव न घेता खासदार जाधव यांनी लगावला होता.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेतही परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत तसाच राहील, अशी ग्वाही खासदार जाधव यांनी पक्षनेतृत्वासमोर दिली. त्यानंतर खासदार व आमदार यांच्यातील मतभेद जाहीरपणे मिटल्याचे दर्शन शिवसनिकांना घडले. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जी रॅली निघाली, त्या रॅलीमध्ये खासदार जाधव यांनी आमदार डॉ. पाटील यांच्या विजयाची ग्वाही देत सत्ता आल्यानंतर थेट त्यांना ‘नामदार’ होण्यासाठीही शुभेच्छा दिल्या. त्या वेळीही दोघांमधील एकवाक्यता शिवसनिकांना दिसून आली. विधानसभेच्या निकालाचे वृत्त कळताच खासदार जाधव यांनी मतमोजणीस्थळी येऊन आमदार डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले. या सर्व घटनाक्रमाने दोघांमधील मतभेद संपुष्टात आल्याचा संदेश शिवसनिकांमध्ये गेला असून लोकसभेतील हेवेदावे विधानसभेत निवळल्याचे चित्र तूर्त तरी पाहायला मिळाले आहे.