पिंपरी-चिंचवड

रुग्णालयात रुग्णांचे होणारे हाल अनेकजण पाहतात,पण त्यांच्या मदतीला सगळेच धावून जातील असे नाही. त्यातही महिला रुग्णांची जास्त गैरसोय होत असल्याचे पाहून एका दुर्गेने पुढाकार घेत या रुग्णांची सेवा करण्याचे ठरवले. इतकेच नाही तर मागील आठ वर्षांपासून हे व्रत ही महिला अतिशय खंबीरपणे पूर्ण करत आहे. विद्या जोशी असे या महिलेचे नाव असून त्यांनी रुग्णांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील महिला रुग्णांना त्या घरगुती जेवणाचा डब्बा देतात. विशेष म्हणजे यासाठी त्या कोणतेही शुल्क आकारत नाहीत. तर हा डबा पूर्णपणे मोफत दिला जातो. त्यात भाजी, चपाती, भात, फळ असे पौष्टिक जेवण देऊन त्यांना आजारातून बरे होण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

जोशी यांचा स्वरूप हा सात वर्षाचा मुलगा आजारी पडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांनी रुग्णालयातील परिस्थिती पहिली होती. मुलगा आजारी पडल्याने त्यांच्या मुलाला तसेच घरच्या व्यक्तींना वेळेवर जेवण मिळत नव्हते. कधी वेळ पडली तर बाहेरून जेवण मागवण्याची वेळही त्यांच्यावर यायची. एकदा रुग्णालयात स्वरूप आजारी असताना जेवणाची वेळ होऊन गेली तरी पती डबा घेऊन पोहोचले नाहीत. त्यावेळी शेजारी असणाऱ्या महिलेने आम्हाला जेवण दिले. ती गोष्ट मनात पक्की बसली होती. रुग्णालयातील रुग्णांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांच्या जेवणाची पंचाईत होऊ शकते हे त्यावेळी प्रकर्षाने जाणवले असे जोशी म्हणाल्या. यामध्ये त्यांचे पतीही त्यांना साथ देतात.

२००९ मध्ये स्वरूप याचा वयाच्या सातव्या वर्षी आजाराने रुग्णालयातच मृत्यू झाला. मुलाचा इतक्या लहान वयात मृत्यू होणे ही खरंतर पूर्णपणे हलवून टाकणारी गोष्ट होती. पण विद्या जोशी यातून बाहेर आल्या आणि त्यांनी रुग्णालयातील महिला रुग्णाचे मन जाणले. त्यामुळे त्यांनी यापुढे या महिलांसाठी ‘एक घास रुग्णासाठी’ असा उपक्रम सुरू करायचा ठरवले. यासाठी त्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना यासंबंधी माहिती देतात. यामुळे महिला रुग्णांना मोफत जेवणाचा डबा मिळतो. त्यांच्या या उपक्रमाने रुग्णदेखील भारावून जात आहेत. विशेष म्हणजे त्या स्वत: हे डबे रुग्णालयात पोहोचवतात. सध्या सोशल मीडियाचे युग असल्याने त्या व्हॉटसअॅपच्या माध्यमातूनही आपल्या या उपक्रमाची माहिती पोहचवतात. याला महिला रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून राबवत असलेल्या या उपक्रमात त्या जात धर्म न पाहता सेवा करतात. या कामातून आपल्याला समाधान मिळते असेही त्या सांगतात. विद्या जोशींचा हा उपक्रम असंख्य रुग्णांना आजारातून बरे होण्यासाठी उपयुक्त ठरत आहे यात शंका नाही.