|| निखिल मेस्त्री

पालघरमध्ये देशभरातील आदिवासी संस्कृतीचे दर्शन

पालघर : कोळगाव येथे झालेल्या आदिवासी एकता महासंमेलनामध्ये देशभरातील विविध प्रांतांतील आदिवासी समाजाच्या संस्कृती, लोककला व परंपरेचे दर्शन पालघरवासीयांना तीन दिवसांत पाहावयास मिळाले. आसाममधील बिहू नृत्य, चंद्रपूर-गडचिरोलीतील गोंड माडिया समाजाचे नृत्य यांसह विविध आदिवासी कलासादरीकरणाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. विशेष म्हणजे परदेशातील आदिवासीही या संमेलनात सहभागी झाले होते.

प्रत्येक प्रांतातल्या आदिवासींच्या विविध कुळांच्या परंपरा येथे पाहावयास मिळाल्या. त्यांचे राहणीमान कसे असते याचे दर्शन उभ्या केलेल्या घरांच्या प्रतिकृतीतून पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. आदिवासी हा निसर्ग पुजणारा असून निसर्गाचे आणि त्याच्याशी निगडित असलेल्या सजीव प्राण्यांचे तो रक्षण करतो हे जगासमोर आणण्यासाठी वैशिष्टय़पूर्ण प्रतिकृती येथे सर्वाना संमोहित करत होत्या.

पूर्वापार आदिवासी एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असून या कुटुंब पद्धतीचे दर्शन या संमेलनामध्ये झाले. याचबरोबरीने आदिवासी लोककला जिवंत ठेवणारे कलावंतही या ठिकाणी मनसोक्त आपली कला सादर करताना दिसून आले. या संमेलनामध्ये आसाममधली आसामी, गुजरातमधली चौधरी, उत्तराखंड, तेलंगणा, गौंड, माडिया, भिल्ल, वनवासी, आंध, ओरावं, कातकरी, कोकणा, कोरकू, कोलाम, टोकरे कोळी, ठाकर, परधान, पावरा, मल्हार कोळी, मन्नर वारलू, वारली व हलबा अशा विविध कुळांचे आदिवासी महासंमेलनात सामील झाले होते. त्यांनी आपल्या विविध संस्कृतीचे दर्शन येथे घडवले.

तारपा वाद्याच्या तालावर संपूर्ण मंडपभर फिरणाऱ्या महिला व तरुण वर्ग सर्वाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. तर हाताने विणलेल्या नारळी पातीच्या टोप्या घालून नाचणारे गुजरात येथील आदिवासी समाजाच्या कलावंतांनी सर्वाच्या टाळ्यांची थाप मिळवली. आसाम येथून आलेल्या आसामी आदिवासी कलावंतांनी बिहू नृत्य सादर करून सर्वाची मने जिंकली. तारपा हे वाद्य नारनदेव या देवतेने आदिवासी समाजाला दिले असल्याची आख्यायिकाही याठिकाणी काही कलावंतांनी सांगितले. विविध आख्यायिका व इतिहास काही जुन्या ज्येष्ठांकडून ऐकावयास मिळाला.

निसर्ग देवतांचे दर्शन

आदिवासी समाज निसर्ग पुजतो म्हणून निसर्गाशी निगडित असलेल्या देवांवर त्याची श्रद्धा आहे हे एका झोपडीसदृश मंदिरांमध्ये गेल्यावर समजले. या मंदिरात विविध देवांचे दर्शन या निमित्ताने सर्वाना घडले. एकंदरीत संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाची वैविध्यपूर्ण संस्कृती यानिमित्ताने पालघरकरांना अनुभवायला मिळाली.