शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात यावे, तसेच शेतीक्षेत्रात ठिबक सिंचन, विहीर खोदकाम, पाईपलाईन आदींसह शैक्षणिक कर्जवाटप करावे, या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भांबळे यांनी सोमवारी याच मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. समाधानकारक आश्वासन मिळाल्याने भांबळे यांनी उपोषण मागे घेतले.
भांबळे यांनी शेतकऱ्यांसह जिंतूर तहसील कार्यालयासमोर सोमवारी उपोषण सुरू केले. जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करावे, तसेच अन्य वेगवेगळ्या स्वरुपाचे कर्ज मंजूर करावे, या मागण्या होत्या. जिंतूर तहसीलदारांनी मध्यस्थी करुन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. जिंतूर तहसील कार्यालयात अग्रणी बँकेचे समन्वयक जराडे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक कवडे व जिंतूर-सेलू तालुक्यांतील स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक आदींस्मवेत भांबळे यांनी चर्चा केली. तथापि मार्ग न निघाल्याने उपोषण चालूच राहिले.
मंगळवारी भांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत, रामेश्वर जावळे, उत्तमराव जाधव, कुमार घनसावंत, अॅड. विनोद राठोड, सुनील घुगे आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. परभणी-जिंतूर, जिंतूर-औरंगाबाद राज्य रस्त्यांवरील वाहतूक आंदोलनामुळे बंद झाली. जिंतूर तहसीलदारांनी पुन्हा आश्वासन दिल्याने भांबळे यांनी आंदोलन मागे घेतले.
सेलू-जिंतूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात येईल, शैक्षणिकसह वेगवेगळी कर्जे मंजूर करण्यात येतील, गारपीटग्रस्तांचे वाटप न झालेले अनुदान तातडीने देण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर भांबळे यांनी उपोषण मागे घेतले. रास्ता रोको आंदोलनही आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.