News Flash

विजय पांढरे आम आदमी पक्षात

पक्षाने आदेश दिले तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त करीत जलसंपदातील गैरव्यवहार उजेडात आणणारे महाराष्ट्र अभियांत्रिकी...

| December 2, 2013 02:06 am

विजय पांढरे आम आदमी पक्षात

पक्षाने आदेश दिले तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त करीत जलसंपदातील गैरव्यवहार उजेडात आणणारे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्थेचे निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी राजकीय क्षेत्रातील आपल्या डावास धडाक्यात सुरुवात केली. रविवारी येथे आम आदमी पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश संयोजक अंजली दमानिया यांनी पांढरे यांचे टोपी घालून व स्वराज हे पुस्तक देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी एखाद्या मुरब्बी राजकारण्याप्रमाणे पांढरे यांनी प्रश्नांची उत्तरे देत राजकीय टोलेबाजी केली.
आपण काही मिळवायचे म्हणून राजकारणात प्रवेश केलेला नाही. तर, देशाच्या राजकीय क्षेत्राची झालेली वाताहत लक्षात घेऊन सज्जन लोकांचे संघटन करण्याचा हेतू यामागे आहे. सध्या सर्व राजकीय पक्षांमध्ये आणि शासनकर्त्यांमध्ये भ्रष्टाचाराने मूळ धरले असल्याने भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या अरविंद केजरीवालांचे हात बळकट करण्यासाठी आपण आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे, असे पांढरे यांनी नमूद केले. शासनकर्ते भ्रष्ट आहेत तोपर्यंत विकासाच्या केवळ वल्गनाच ठरणार आहेत. भ्रष्ट प्रवृत्तींविरोधात राजकारणाबाहेर राहून लढा देण्याने फारसे काही साध्य होणार नसल्याने राजकारणात प्रवेश हा मार्ग आपण निवडला. आता संपूर्ण राज्यात आपण पक्षाचा प्रचार करणार असून त्यासाठी प्रवचनांचाही आधार घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जलसंपदातील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी नियुक्त चितळे समितीने अहवाल मांडल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल.
या चौकशीत अधिकाऱ्यांनाच दोषी धरले जाण्याची आणि सूत्रधार मोकाटच राहण्याची शक्यता आहे. सूत्रधार कोण हे सर्वानाच माहीत असून त्यांचे नाव वेळ आल्यावर आपण जाहीर करू. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी केल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही, असे पांढरे यांनी नमूद केले. यावेळी पक्षाच्या प्रदेश संयोजक अंजली दमानिया यांनी सिंचनातील गैरव्यवहारांविषयीची माहिती जाणून घेण्याच्या हेतूने पांढरे यांच्याशी संपर्क येत गेल्याचे स्पष्ट करीत त्यातूनच आम आदमी पक्षात येण्याविषयी त्यांना आमंत्रण देण्यात आल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेनंतर पक्षाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळावाही झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2013 2:06 am

Web Title: vijay pandhare joined aap
टॅग : Vijay Pandhare
Next Stories
1 सांगलीतील प्रस्तावित वन अकादमीवरून वादाची शक्यता
2 ‘शेतकरी धोरणाविरोधात ९ डिसेंबरला रास्ता रोको’
3 राजापूर नगर परिषदेत काँग्रेसला जबर धक्का; नगराध्यक्षांसह चार जणांची निवड न्यायालयाकडून रद्द
Just Now!
X