भारतात गोरक्षेचे काम करणारे मुसलामान आणि इतर धर्माचेही लोक आहेत. बजरंग दलाप्रमाणे गायींच्या रक्षणासाठी मुस्लिमांनीही आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, असे सांगत सरसंघचालक मोहन भागवत गोरक्षेचा मुद्दा धार्मिक नसल्याचे सांगितले. ते शनिवारी नागपुरात दस-यानिमित्त आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील गोरक्षक आणि गोपालक सद्भावनेने आपले काम करत असल्याचे सांगितले. त्यामुळे काही चुकीच्या घटनांचा संबंध त्यांच्याशी जोडू नका, असे आवाहन त्यांनी केले.

गोरक्षेच्या नावावर होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये गोरक्षकांचे नाव घेतले जाते. मात्र, गायीचे रक्षण करणारे गोरक्षक हिंसक कसे होऊ शकतात?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. गायींना वाचवण्यासाठी हिंसा करणा-यांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. मुळात गोरक्षा करणारे हिंसा करुच शकत नाही, धर्माच्या नावाखाली हिंसा अमान्य आहे. त्यामुळे गोरक्षकांच्या नावावर हिंसा करणा-यांवर कारवाई व्हावी. त्यांना दंड व्हावा, असे त्यांनी स्पष्ट केले. गोरक्षेचे काम करणारे मुसलामान आणि इतर धर्माचेही लोक आहेत. हा मुद्दा धार्मिक नाहीच. त्यामुळे त्याला धर्माशी जोडणं गैर आहे. त्यामुळे समाजात विनाकारण संघर्ष निर्माण होतो. कोणत्याही कारणांमुळे हिंसा होऊ नये या मताचे आपण आहोत. त्यामुळे गोरक्षणाचे काम करणाऱ्यांनीही कायदा सुव्यवस्थेचं पालन केलं पाहिजे. मात्र, सद्भवानेने काम करणाऱ्या गोरक्षकांचा संबंधही हिंसाचाराशी जोडणे चुकीचे ठरेल असे त्यांनी सांगितले.

यावेळी मोहन भागवत यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य करत आपलं मत मांडलं. रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित करत मोहन भागवत बोलले की, बांगलादेशी घुसखोरांची समस्या अद्याप सुटली नसताना आता रोहिंग्यांचा प्रश्न पुढे आला आहे. रोहिंग्यामुळे फक्त आपल्या रोजगारावर भर पडणार नाही तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे. माणुसकी वैगेरे ठीक आहे पण आपला विनाश करुन माणुसकी दाखवता येत नाही. रोहिंग्यांना म्यानमारमधून का हाकललं याचा याची समीक्षा करायला हवी. रोहिंग्ये भारतात का घुसू शकले? रोहिंग्यांच्या घुसखोरीमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.