News Flash

मोहिते-पाटील सांगा कुणाचे?

संस्थांना सरकारी आशीर्वाद मिळावा म्हणून भूमिका बदलल्याची चर्चा

संस्थांना सरकारी आशीर्वाद मिळावा म्हणून भूमिका बदलल्याची चर्चा

एजाज हुसेन मुजावर, सोलापूर

राष्ट्रवादी काँग्रेसपासून यापूर्वीच दुरावलेले आणि गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात, पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेले ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर, आपण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत, असा दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. आपले पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये गेले असले तरी आपण त्या पक्षात कधीही गेलो नाही, तर राष्ट्रवादीतच आहोत, असा त्यांनी केलेला दावा खरोखर गांभीर्याचा भाग समजायचा की गमतीचा, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

यापूर्वी माढा लोकसभा मतदारसंघातून २०१४ साली मोदी लाटेतही केवळ व्यक्तिगत ताकदीवर, राष्ट्रवादीतर्फे निवडून आलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांना मागील लोकसभा निवडणुकीत मात्र माढय़ातून राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीच्या राजकारणात उमेदवारी देण्यास जाणीवपूर्वक विरोध झाला. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादीत राहून अपमान सहन करण्यापेक्षा थेट भाजपचा मार्ग पत्करला होता. त्या वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही काँग्रेसमधून भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात मेगा भरती झाली होती. यात पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपने मोहिते-पाटील यांची मदत घेतली होती. स्वत: विजयसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये न जाता तांत्रिकदृष्टय़ा राष्ट्रवादीत असले तरी त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपची ताकद वाढविण्यासाठी गांभीर्याने राजकीय डाव खेळले होते. माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील हे स्वत: उभे न राहता भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्याच वेळी अकलूजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या विराट सभेत विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. नंतर त्यांची ऊठबैस भाजप नेत्यांमध्ये वाढली होती. भाजपच्या काही बैठका व सभांना त्यांनी थेट हजेरी लावली होती. मात्र नंतर त्यांनी, आपण अजूनही राष्ट्रवादीतच आहोत, असा खुलासाही केला होता. या खुलासा कोणीही गांभीर्याने घेतला नव्हता.

या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा निवडणुकीत वरकरणी भाजपचे रणजितसिंह निंबाळकर व राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात औपचारिक लढत झाली असली तरी प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने ती प्रतिष्ठेची लढत विजयसिंह मोहिते-पाटील आणि शरद पवार यांच्यातच झाल्याचा राजकीय अन्वयार्थ काढण्यात आला होता. त्यावेळी मोहिते-पाटील यांनी स्वत:च्या माळशिरस भागातून भाजपचे निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य मिळवून दिले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात प्रतिष्ठा पणाला लावली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा समारोप सोलापुरात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला असता त्या वेळी व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील यांना सन्मानाने स्थान देण्यात आले होते. तथापि, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला खिंडार पाडूनदेखील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यानंतर राज्यात वेगळ्याच राजकीय नाटय़मय घडामोडी घडल्या आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी सत्तेवर आली. या सत्तांतराचा प्रतिकूल परिणाम मोहिते-पाटील यांच्या राजकारणावर झाला. विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ासह पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात मतदारांनी कौल दिल्यामुळे मोहिते-पाटील यांच्या प्रभावक्षेत्रातही घट होणे स्वाभाविक होते. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर रणजितसिंह मोहिते-पाटील यांना विधान परिषदेवर सामावून घेत राज्यमंत्रिपदाची संधी दिली गेली असती, असे आजही राजकीय जाणकार सांगतात.

या पार्श्वभूमीवर आता राज्यात भाजप सत्तेपासून दूर जाऊन राष्ट्रवादीचा प्रभाव वाढल्यामुळे मोहिते-पाटील हे राजकीयदृष्टय़ा अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे त्यांच्याशी संबंधित     संस्थाही आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आहेत. प्राप्त परिस्थितीत स्वत:ला सावरण्यासाठी म्हणून, आपण अजूनही राष्ट्रवादीतच आहोत, असा मोहिते-पाटील यांनी दावा करणे हा गांभीर्याचा मुद्दा होऊ शकतो. परंतु त्याची दखल राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून कितपत घेतली जाते, हा मुद्दादेखील तेवढाच महत्त्वाचा आहे.

राष्ट्रवादीत की भाजपमध्ये? कोडे कायम!

मोहिते-पाटील हे आजही तांत्रिकदृष्टय़ा राष्ट्रवादीतच आहेत, हे जरी खरे असले तरी त्यांनी या पक्षाशी असलेली नाळ लोकसभा निवडणुकीतच तोडली होती, ही वस्तुस्थिती आहे. परंतु तरीही त्यांचे राष्ट्रवादीत राहणे आणि त्यांना राष्ट्रवादीकडून स्वीकारले जाणे, याचे उत्तर येत्या काही दिवसांतच मिळू शकेल. तूर्त तरी मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीचे की भाजपचे, याचे कोडे कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:54 am

Web Title: vijaysinh mohite patil change bjp camp back in ncp zws 70
Next Stories
1 सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा प्रयोग
2 पश्चिम विदर्भातील शेतकरी नैराश्याच्या गर्तेत
3 अंगणवाडी कर्मचारी मानधनाविना
Just Now!
X