राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत साठमारीच्या राजकारणात मोहिते घराणे पिछाडीवर

सोलापूर जिल्ह्य़ासह पश्चिम महाराष्ट्रात एकेकाळी लौकिक असलेले मोहिते-पाटील घराणे अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत साठमारीच्या राजकारणात पिछाडीवर गेले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय प्रक्रियेपासून दूर असलेले हे घराणे राजकीयदृष्टय़ा सध्या शांत आहे. ‘थांबा, पाहा आणि पुढे चला’ या भूमिकेतून केव्हा बाहेर पडणार, याचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. विशेषत: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मोहिते-पाटील हे कोणत्याही जबाबदारीविना शांत राहताना सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे भवितव्य कसे असणार हा देखील उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

शरद पवार आणि खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यात राजकीय संबंध एकमेकांच्या तडजोडीतूनच निर्माण झाले. त्यात अधुनमधून कटुता व शह-प्रतिशहाचे राजकारण झाल्याचे इतिहास सांगतो. यापूर्वी पवारांपेक्षा वसंतदादा पाटील यांच्याशी जिव्हाळा बाळगून राहिलेले मोहिते-पाटील यांना पुढे पवारांच्या सोबतीला जाणे भाग पडले. १९९९ मध्ये पवारांनी राष्ट्रवादी काँंग्रेसची स्थापना केली तेव्हा मोहिते-पाटील यांच्याकडे सर्वाचे लक्ष होते. मोहिते-पाटील कोणती भूमिका घेतात याबाबत वेगवेगळे मतप्रवाह तेव्हा होते. अर्थात मोहिते-पाटील हे अखेर राष्ट्रवादीत गेले. त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रदेश युवक अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली. पुढे २००२ साली जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, तेव्हा संपूर्ण राज्यात सोलापूर व सिंधुदुर्ग अशा दोनच जिल्हा परिषदा राष्ट्रवादीच्या ताब्यात येऊ शकल्या. त्यावेळी पुणे जिल्हा परिषदेतही बहुमत मिळाले नव्हते.

सोलापूर जिल्ह्य़ातील आपले विरोधक सुशीलकुमार शिंदे हे २००३ साली मुख्यमंत्री होऊ लागले, तेव्हा विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही हट्टाने उपमुख्यमंत्रिपद स्वत:कडे घेतले. हा हट्ट शरद पवार यांना कितपत पसंत होता, हे अजूनही ठाऊक नाही. पुढे मोहिते-पाटील यांचे आवडते सार्वजनिक बांधकाम खाते काढून त्यांना ग्रामविकास खाते देताना एका प्रकारे त्यांची राजकीय पदावनती केली. नंतर २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे स्वत: मोहिते-पाटील यांच्या बालेकिल्ल्यात माढा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून मोहिते-पाटील यांचे पंख छाटायला आणखी वेग आला. त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत साठमारीच्या राजकारणात तर त्यांचा अक्षरश: बळीच देण्यात आला. माळशिरस हा मतदारसंघ राखीव झाल्याने विजयदादांनी शेजारील पंढरपूर हा मतदारसंघ हट्टाने मागून घेतला. विजयदादांचा हट्ट राष्ट्रवादीने मान्य केला. पण पंढरपूरकरांनी दादांची डाळ शिजू दिली नाही. राष्ट्रवादीचे दादांच्या विरोधातील नेते एकत्र आले आणि त्यांनी अपक्ष भारत भालके यांना मदत केली.

नेमके त्याचवेळी पवार काका-पुतण्यांनी सोलापूर जिल्ह्य़ात मोहिते-पाटील यांच्या विरोधात स्वत:चे प्यादे पुढे केले व त्यांना ताकद दिली. परंतु त्यामुळे पक्षात कोठेही ताळमेळ राहू शकला नाही. मागील सहा-सात वर्षांत पक्षाची विस्कटत चाललेली घडी बसविण्यासाठी प्रा. लक्ष्मण  ढोबळे व नंतर दिलीप सोपल यांना संधी दिली गेली. परंतु, या दोघांकडे नेते म्हणून मर्यादा होत्या. त्यातून पक्षात इतकी बेदिली माजली की, कोणाचा पायपोस कोणात राहिला नाही. जिल्हा परिषदेत सभापतिपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. इतकेच नव्हे तर जिल्हा परिषदेतून सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमा हटविण्याचाही प्रयत्न झाला.

का हा दुरावा?

मोहिते-पाटील यांची अजित पवार यांच्यापासून चार हात दूर राहण्याची भूमिका आज तरी कायम आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्य़ात पक्षाचे भवितव्य कसे असेल, जिल्हा परिषदेत पक्षाची सत्ता कितपत टिकून राहील, यासंदर्भात अजित पवार यांचीच कसोटी राहणार असताना मोहिते-पाटील यांची शांत राहण्याची मानसिकता दिसून येते.

  • या सर्व घडामोडीत पक्षीय निर्णय प्रक्रियेपासून दूर राहिलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांची भूमिका संयमाचीच राहिली असताना दुसरीकडे अजित पवार यांनी मोहिते-पाटील विरोधात ज्यांना ताकद दिली, तीच मंडळी बारामतीत शरद पवार यांच्या घरावर मोर्चा नेणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर गेली. पवार काका-पुतण्याच्या गळ्यातील ताईत बनलेले आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांच्यासह पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांनी स्वाभिमानीच्या माध्यमातून मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात आमदारकीचे स्वप्न पाहिले.
  • अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडे निर्विवाद मते असूनही महायुतीच्या माध्यमातून प्रशांत परिचारक हे निवडून आले. राष्ट्रवादीपेक्षा अजित पवार यांना ‘पेरले ते उगवले’ हाच धडा मिळाला. तर दुसरीकडे स्वत: अजित पवार यांनी पक्षाची बिघडलेली घडी नीट बसविण्यासाठी सोलापूरकडे जातीने लक्ष देत प्रत्येक तालुक्यात संपर्क वाढविला आहे. परंतु, त्याचा लाभ गेल्याच महिन्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत पक्षाला झाला नाही. तर उलट अनेक ठिकाणी सत्ता गमवावी लागली.
  • कुर्डूवाडीत राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार बबनराव शिंदे यांची ताकद असूनही प्रत्यक्षात संजय शिंदे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा प्रभाव वाढला, याचे राष्ट्रवादीला गम्य वाटत नाही. सध्या जिल्हा दूध उत्पादक संघात राष्ट्रवादीचे बहुमत असूनही प्रशांत परिचारक हेच अध्यक्षपदावर कायम आहेत. त्याबाबतही अजित पवार यांची भूमिका संदिग्ध दिसून येते.