सोलापूर जिल्हा परिषदेत सत्तांतर

एजाज हुसेन मुजावर, लोकसत्ता

Tamil Nadu news M. K. Stalin
तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
Heena Gavit nandurbar
नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर स्वत:च्या सोलापूर जिल्ह्य़ातील राजकारणात मोहिते-पाटील गटाला शह देऊन सातत्याने मागे खेचण्याचे प्रयत्न शरद पवार अजित पवार यांच्याकडून होत असताना त्यास प्रत्युत्तर देताना मोहिते-पाटील गटाने अस्तित्व पणाला लावत जिल्हा परिषदेची सत्ता भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीच्या माध्यमातून पुन्हा स्वत:कडे खेचून आणली आहे. राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील महाविकास आघाडीचे स्पष्ट बहुमत असतानादेखील सत्तांतर घडले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पवार-मोहिते यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

तसे पाहता पवार-मोहिते संघर्ष हा नवीन नाही. मागील सुमारे ३०-३५ वर्षांपासून हा संघर्ष कधी सुप्त तर कधी उघड स्वरूपात दिसून आला आहे. २० वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकट गेले होते खरे; परंतु तरीही पुढे सुप्तपणे शह-प्रतिशहाचे राजकारण सुरूच राहिले होते. गेल्या दहा वर्षांत पवार काका-पुतण्याने मोहिते-पाटील गटाचे खच्चीकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असता अखेर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अपेक्षेप्रमाणे स्फोट होऊन मोहिते-पाटील कुटुंबीय थेट भाजपवासी झाले. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सत्तेवर आली असता मोहिते-पाटील अडचणीत आले खरे; यातच स्वत: विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अजूनही राष्ट्रवादीच आहोत, असा खुलासा करून ‘गुगली’ टाकल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर पवार काका-पुतण्यांच्या अनुयायांकडून सोलापूर जिल्हा परिषदेची सत्ता मोहिते-पाटील यांनी खेचून आणल्यामुळे पवार-मोहिते संघर्ष भविष्यात पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सत्तांतराच्या लढाईत स्वत: विजयसिंह मोहिते-पाटील हे कोठेच उघडपणे सक्रिय नव्हते. त्यांचे पुत्र, माजी खासदार रणजीतसिंह आणि पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्हा परिषदेचा किल्ला सर केला आहे. या घडामोडीत भाजप व समविचारी आघाडीची व इतर मंडळींची साथ राहिली.

सत्तास्थाने मोहितेंच्या ताब्यात

यापूर्वी वर्षांनुवर्षे सोलापूर जिल्हा मोहिते-पाटील यांच्या ताब्यात होता. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ, अनेक साखर कारखाने इत्यादी सत्तास्थाने त्यांच्याच वर्चस्वाखाली होती. यात पवारांशी झालेल्या सुप्त संघर्षांत जिल्हा परिषदेत कधी मोहिते-पाटील गटाच्या विरोधात एखाद्याला ‘पवारनिष्ठा’ला अध्यक्षपद सांभाळण्याची संधी मिळाली असता त्यास सत्तेच्या खुर्चीवरून हुसकावून लावण्याचेही धाडस मोहिते-पाटील गटाने केल्याचा दाखला सापडतो. १९८७-८८ च्या सुमारास जिल्हा परिषदेत ‘पवारनिष्ठ’ काकासाहेब निंबाळकर (करमाळा) हे अध्यक्षपदावर विराजमान झाले असता थोडय़ाच दिवसात त्यांच्या विरोधात मोहिते-पाटील गटाने अविश्वास ठराव आणून त्यांची उचलबांगडी केली होती. जिल्हा परिषदेत स्वत: विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह त्यांचे बंधू दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह व मदनसिंह यांच्यासह त्यांचे चुलत बंधू फत्तेसिंह माने आदींनी अध्यक्षपद सांभाळले होते.

राजकीय समीकरणे बदलली

२००९ सालच्या माढा लोकसभा निवडणुकीत स्वत: शरद पवार हे उतरले आणि निवडून आले. तेव्हापासून ते  जिल्ह्य़ातील राजकारण हाताळू लागले, पुढे  त्याच वर्षी झालेल्या  विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे बदलली. त्यातून मोहिते-पाटीलविरोधकांना पवार काका-पुतण्याने उघडपणे ताकद दिल्याने एका पाठोपाठ एक सत्तास्थाने मोहिते यांच्या ताब्यातून निसटत गेली. एवढेच नव्हे तर मोहिते-पाटील गटाला सत्तेपासून दूर लोटण्यासाठी ‘अजितनिष्ठ’ मंडळींनी थेट भाजप पुरस्कृत महाआघाडीच्या नावाखाली जिल्हा परिषदेची सूत्रे स्वत:कडे ठेवली होती. कालपर्यंत पवार काका-पुतण्याच्या मर्जीतील मंडळींकडे असलेल्या जिल्हा परिषदेतील सत्तेला मोहिते-पाटील यांनी सुरुंग लावला. त्यासाठी भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीचाच वापर करून विरोधकांची खेळी त्यांच्यावर उलटविली. यात मोहिते-पाटील यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचेही दिसून येते. यात त्यांचेच समर्थक असलेले करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या समर्थकाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देताना करमाळ्यातील अजितनिष्ठ अपक्ष आमदार संजय शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजीमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधानसभा निवडणुकीत करमाळ्यात नारायण पाटील यांना डावलून राष्ट्रवादीतून आयात केलेल्या रश्मी बागल यांना संधी दिली होती. परंतु यात नारायण पाटील यांच्यापेक्षा २० हजार कमी मते बागल यांना मिळाली होती.