सोलापूर : विजयसिंह मोहिते-पाटील आणि आपण अनेक वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात एकत्र होतो. विजयसिंह हे माझ्या अगोदरपासून राजकारणात आले. ४५ वर्षांपूर्वी आपण पोलीस खात्याच्या सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात पदार्पण केले आणि आपणास विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे ठरले, त्या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपली शिफारस केली होती, अशी आठवण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीरपणे काढली. निमित्त होते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे.

उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने तिऱ्हे येथे आयोजिलेल्या समारंभात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा अमृत महोत्सवी सत्कार सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्या वेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांविषयींच्या जुन्या आठवणींना उजाळा देत परस्पर मैत्रीभाव जागवला. संयोजक भारत जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी व्यासपीठावर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बळिराम साठे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील आदी उपस्थित होते. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराची सुंदर प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या समारंभाचे औचित्य साधून आणि दुष्काळाची जाणीव ठेवून प्रातिनिधिक स्वरूपात पाच शेतक ऱ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. तसेच सोलापूरच्या पाखर संकुल संस्थेलाही आर्थिक साह्य़ देण्यात आले.

शिंदे म्हणाले, विजयसिंह मोहिते आणि आपण दोघे अनेक वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात होतो. जी जी खाती त्यांना मिळाली, ती सर्व खाती त्यांनी अतिशय जबाबदारीने सांभाळली. सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. ग्रामीण भागातून आलेल्या विजयदादांकडे सांस्कृतिक खाते होते. हे खाते ते कसे सांभाळतील, याची शंका होती. परंतु त्यांनी हे खाते देखील तेवढय़ाच जबाबदारीने सांभाळले. त्यांचे मन रसिकतेने भरलेले आहे. लोकनाटय़ कलावतांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी पुढे नेले. हा सांस्कृतिक चळवळीचा वारसा ग्रामीण भागातील सहकारी चालवतो, याचा आपणास आनंद वाटतो. आमच्यात भांडणे लावण्याचे काम काही मंडळींनी केले खरे. परंतु आमच्यात कधीही मैत्रीचा धागा तुटू दिला नाही, असे त्यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना खासदार मोहिते-पाटील यांनी, सुशीलकुमार शिंदे यांच्याबरोबर मंत्रिमंडळात आपण अनेक वर्षे कार्यरत असताना परस्पर मैत्री टिकवून ठेवली. शिंदे हे मुख्यमंत्री आपण उपमुख्यमंत्री म्हणून एकाच वेळी काम करीत असताना सोलापूर जिल्ह्य़ाच्या विकासासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पालाही मंजुरी दिली. हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागण्याची आत्यंतिक गरज आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण पूर्ण झाल्याशिवाय दुष्काळाचा डाग पुसला जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी राजन पाटील यांचेही भाषण झाले. राजू सुपाते, राजू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.