स्वतंत्र विदर्भाचा मुद्याने संसदेत गोंधळ उडाल्यानंतर आता महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांरांचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी समाचार घेतला. स्वतंत्र विदर्भाची मागणी करणे म्हणजे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहूती देणाऱ्या हुतात्मांचा अनादर असल्याचे मत त्यांनी रविवारी शिर्डीत व्यक्त केले. यावेळी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला समर्थन करणाऱ्या आमदार आणि खासदारांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचे धाडस दाखवावे, असे त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. सरकार स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरुन जनतेची दिशाभूल करत असल्याचे सांगत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी  शिर्डीमध्येच योग्य वेळ आल्यावर महाराष्ट्राचे विभाजन करु, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाला आणि भाजप सरकारच्या विदर्भासंबंधित भूमिकेला विखे-पाटलांनी उत्तर दिले आहे. यापूर्वी भाजप खासदार नाना पटोले यांनी वेगळ्या विदर्भाचा ठराव संसदेत मांडल्याचे पडसाद शुक्रवारी विधान परिषदेत पाहायला मिळाले होते. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरून घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला होता. संसदेतील गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज देखील तहकूब करण्यात झाले होते. भाजप सरकारला महाराष्ट्र तोडायचा आहे का, असा सवाल यावेळी विरोधकांनी उपस्थित केला होता.