विक्रमगड तालुक्यातील चिंचघर—आपटी ग्रुप ग्रामपंचायतीमधील सरपंच दयानंद गिंभळ यांची  ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्ची  मंगळवारी (१२ जानेवारी)  सकाळी अज्ञात व्यक्तींनी  कार्यालयाबाहेर काढून  पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

चिंचघर ग्रामपंचायतीमध्ये अनेक योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत. पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही कुठलीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.  यावरून सरपंच व सदस्य यांच्यात झालेल्या वादात ही घटना घडली असल्याचा संशय व्यक्त  केला जात आहे.

सकाळी  ९ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या शिपायाने कार्यालय उघडल्यानंतर कार्यालयात साफसफाई करत असताना या शिपायाच्या नकळत एका अज्ञात व्यक्तींनी सरपंचाची खुर्ची कार्यालयाबाहेर काढून पेट्रोल ओतून पेटवून दिली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येते.

या बद्दल सरपंच दयानंद गिंभळ यांच्याशी संपर्क केला असता  खुर्ची जाळण्याचे कारण  समजलेले नाही. या प्रकरणी विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  पोलीस आणि पंचायत समिती स्तरावरून चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे सरपंच गिंभळ यांनी सांगितले. याबाबत विक्रमगड पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, हा प्रकार अंतर्गत वादातून झाला असावा, यामध्ये प्रशासनाचा संबंध नाही, असे ग्रामपंचायत सदस्य श्रृती पाटील यांनी सांगितले.