News Flash

८०० मीटर रस्त्याची रखडपट्टी

कामासाठी तरतूद करण्यात आलेली सर्व रक्कम लाटण्याचा प्रयत्न झाला आहे.

|| नीरज राऊत

चार वर्षे; एक कोटी ३८ लाखांचा खर्च, तीनदा निविदा

पालघर : विक्रमगड ते वेहेलपाडा या साडेसहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम तीन स्वतंत्र निविदांद्वारे २०१६ मध्ये वेगवेगळ्या नावाने झाल्याचे उघडकीस आले आहे. या कामांवर सुमारे एक कोटी ३८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. तरीही ८०० मीटर अंतराचे रुंदीकरण आणि डांबरीकरण अद्याप झालेले नाही.

इतर विभागांच्या आर्थिक शीर्षकांतर्गत यापूर्वी झालेल्या कामांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित विभागाची परवानगी न घेता या रस्त्यावर मलमपट्टी केली आहे. कामासाठी तरतूद करण्यात आलेली सर्व रक्कम लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. या सर्व प्रकाराची दक्षता आणि गुण नियंत्रण प्रात्यक्षिक प्रयोगशाळेच्या वतीने चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

विक्रमगड तालुक्यातील ब्राह्मणपाडा-वेहेलपाडा रस्ता (४५ लाख), विक्रमगड-आंबेडकर रस्ता (४८ लाख)     तसेच पडवळ पाडा ते आंबेघर रस्ता (४५ लाख) अशा तीन रस्त्यांची काम करण्यात आली. प्रत्यक्ष ही तिन्ही कामे विक्रमगड – ब्राह्मण पाडा-आंबेकर आणि वेहेलपाडा असे सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. मुळात पडवळ पाडा आणि ब्राह्मण पाडा विक्रमगडपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसलेले पाडे असून वेगवेगळ्या गावांकडून वेहेलपाडय़ाकडे येण्यासाठी या गावांच्या नावांमध्ये बदल करून शासनाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

रस्ते कामांवरील आक्षेप असे..

यापूर्वी अस्तित्वात असलेल्या तीन मीटर रस्त्याचे रुंदीकरण करून साडेपाच मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे, रस्त्याच्या बाजूला गटार तयार करणे, तसेच रस्ता तयार झाल्यानंतर त्याच्या बाजूला मातीचा भराव टाकणे, अस्तित्वात असलेल्या मोऱ्या आणि साकव यांची डागडुजी करणे, आवश्यकतेनुसार रस्त्यात पावसाचे पाणी जाण्यासाठी वाहिनी टाकण्यात इत्यादी कामे यात अंतर्भूत होती. असे असताना पूर्वीच रुंदीकरण झालेल्या रस्त्याच्या भागावर पुन्हा डांबरीकरणाचा थर टाकल्याचे आरोप येथील नागरिक करीत आहेत.

पद्धतीने या रस्त्यावर असलेल्या मोऱ्यांचे रुंदीकरण आणि दुरुस्ती झाली नसल्याचे सांगून या रस्त्यावर आवश्यक असलेले मार्ग फलक व माहिती दर्शवणारे फलक बसविण्यात आले नसल्याचे दिसून आले आहे.

या रस्त्यावर बालापूर फाटय़ापासून आठशे मीटर रुंदीचा रस्ता हा अजूनही फक्त तीन मीटर रुंद असून त्यावर कोणत्याही प्रकारे डांबरीकरण झाले नसल्याने त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. गेल्या महिन्यात राज्यपालांचा या भागात दौरा असल्याने या रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबरीकरणाचे नव्याने पट्टे मारण्यात आले आहेत.

मार्गिका रेखांकन करीत मारण्यात येणाऱ्या थर्मोप्लास्टिक रंगाच्या रेषा विक्रमगडपासून फक्त आठशे मीटपर्यंत अंतरावर असल्याचे दिसून आले आहे. तसेच यापूर्वी जिल्हा परिषदेने हा रस्ता केल्याचे सांगण्यात येत आहे. या रस्त्यावर दीड कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेकडून परवानगी घेतली नाही.

रस्त्याच्या कामाची स्थिती पाहता त्यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. हे काम देताना तीन ठेकेदारांकडून निविदा मागवण्यात आल्या नसल्याचे आमची माहिती आहे.

– रूपेश डोले, तक्रारदार, युवा प्रहार ग्रुप, विक्रमगड

विक्रमगड-वेहेलपाडा रस्ता हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचा त्या रस्त्याची कोणताही संबंध नाही.

-विजय सपकाळ, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 12:49 am

Web Title: vikramgad velelpadha raod four year one corore thirty eight lack three time tender akp 94
Next Stories
1 पालघरमध्ये नागरिकांची स्वयंशिस्त
2 ५० कोटी रुपयांची मासळी निर्यातीविना पडून
3 चिकनवर संक्रांत, भाजीपाला तेजीत
Just Now!
X