07 April 2020

News Flash

विलासराव पाटील-वाठारकर यांचे निधन

कराड जनता उद्योगसमूहाचे प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलासराव पाटील-वाठारकर यांचे आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.

| March 18, 2014 03:27 am

कराड जनता उद्योगसमूहाचे प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलासराव पाटील-वाठारकर यांचे आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मेंदूत रक्तस्राव झाल्याने २३ जानेवारी रोजी येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर ते बेशुद्धावस्थेतच राहिले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मालदीव येथे त्यांचे जावई प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश पाटील यांच्या आकस्मिक निधनाने वाठारकरांना मानसिक धक्का बसला होता.
कराड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील व येथील सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. परेश पाटील या दोन मुलांबरोबरच मुलगी राजश्री, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार त्यांच्या मागे आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून राजकीय क्षेत्रात दबदबा असणारे विलासराव पाटील-वाठारकर हे बापू म्हणून सर्वत्र परिचित होते. शेकापचे खंदे समर्थक असलेले वडीलबंधू भाई वसंतराव पाटील यांच्याकडूनच त्यांना राजकीय वारसा लाभला. कराड तालुक्यातील प्रतिष्ठित वाठार गावचे सरपंच म्हणून त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस प्रारंभ झाला. जनता बँकेचे संचालक, कार्यकारी संचालक व अध्यक्ष म्हणून त्यांनी १९७५ पासून बँकेची धुरा सांभाळली. जनता उद्योगसमूहाचे प्रमुख असलेल्या वाठारकरबापूंनी सन १९८५ मध्ये एस काँग्रेसमधून, तर १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून कराड दक्षिणेत विधानसभेची निवडणूक लढवली. २००९ मध्ये ते अपक्ष म्हणून लढले, मात्र आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले.
दरम्यान, शरदनिष्ठेचे फळ म्हणून त्यांना केंद्रशासनाच्या नाफेडवर संचालक म्हणून संधी मिळाली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणूनही २०१० साली त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने सन्मान केला. २००१ ते २००४ या कालावधीत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. जनता बँकेच्या माध्यमातून त्यांनी बझार, शेतमाल प्रक्रिया संस्था, औद्यागिक उत्पादक संस्था आदी संस्था उभारल्या. वेणूताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कराड केंद्राचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. राजकारणाबरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2014 3:27 am

Web Title: vilasrao patil vatharakar passed away 2
Next Stories
1 जायकवाडीच्या पाण्याला पुन्हा स्थगिती
2 वृद्ध मातेचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न; बालरोगतज्ज्ञावर गुन्हा
3 मराठवाडय़ात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Just Now!
X