खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी ग्रामोद्योगास चालना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामोपयोगी तंत्रज्ञान लहान गावापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

राज्यपाल आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या भेटीत त्यांनी सेवाग्राम आश्रम, गीताई मंदिर, मगन संग्रहालय, एमगीरी व पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमास भेट दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सुतमाला, चरखा व पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचा सत्कार केला. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. प्रभू यांनी त्यांचे स्वागत करतांना महात्मा गांधींची काही पुस्तके सुध्दा भेट दिली.  खासदार रामदास तडस यांनीही याच ठिकाणी त्यांचे स्वागत केले.

आश्रमातल्या चरखागृहात चालणाऱ्या सुतकताई, हातमाग व खादी विक्रीची माहिती राज्यपालांनी जाणून घेतली. चरख्यावर सुतकताईसुध्दा केली. तसेच स्वत:साठी दहा मीटर खादीचे कापड खरेदी केले. गांधीजींच्या भोजन गृहात त्यांनी आश्रमपध्दतीने तयार होणाऱ्या जेवणाचा आस्वादही घेतला. गीताई मंदिराला भेट देतांना राज्यपालांनी शिळेवर कोरलेल्या गीताईच्या अध्यायांचे वाचन केले. मगन संग्रहालयात चालत असलेल्या ग्रामोद्योगाची माहिती घेतांनाच त्यांनी संग्रहालयाची पाहणी केली. महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था (एमगीरी)येथे भेट देतांना त्यांनी बा आणि बापू यांच्या पूतळ्यास सुतमाला अर्पण करून अभिवादन केले.

पवनार आश्रमात गौतम बजाज यांनी राज्यपालांचे स्वागत करतांना आश्रमात चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. आश्रमात वास्तव्यास असणाऱ्या भगिनींशी संवादही साधला. उत्खननात सापडलेल्या आश्रमातील मुर्तींची त्यांनी पाहणी केली. प्रारंभी वर्धेत आगमन झाल्यावर राज्यपालांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्याशी करोना विषयक उपाय योजनांबाबत चर्चा केली. आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे, सरपंच सुजाता ताकसांडे हे राज्यपालांसोबत सेवाग्राम दौऱ्यात सहभागी होते.