अलिबाग— मुंबईतून कोकणात येणाऱ्यांना गावबंदी करण्याचे प्रकार  समोर आले आहेत. गावकऱ्यांनी रस्त्यात दगड, पाण्याचा टाक्या आणि झाडेझुडपे टाकून रस्ते बंद केले आहेत. मात्र अशा पध्दतीने गावबंदी केली तर कारवाई करू असा इशारा रायगडचे पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी दिला.

मुंबईतील करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन नोकरदारांनी कोकणाची वाट धरली आहे. मिळेल त्या वाहनाने ते आपले गाव गाठत आहेत. मात्र मुंबईतून गावात दाखल होणाऱ्या  या मुंबईकरांची स्थानिकांना धास्ती वाटू लागली आहे. एखाद्या व्यक्तीला करोनाची बाधा असेल तर गावातही करोनाचा प्रादुर्भाव होईल अशी भीती त्यांना वाटते आहे. त्यामुळे अनेक गावात परवानगी शिवाय प्रवेश नाही असे फलक लागल्याचे दिसून  येत आहे. ज्या गावात अशी गावबंदी करण्याचा प्रयत्न होईल त्या गावातील सरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा रायगडचे पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी दिला. अशी बेकादेशीरपणे गावबंदी करण्याचा प्रयत्न केला तर जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनीही सर्व ग्रामपंचायतींना असे प्रकार तातडीने थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.