जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाच्या प्रादूर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामपातळीवर प्राथमिक लक्षणांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामपंचायतस्तरावर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आशा’ स्वयंसेविकांमार्फत करोनाची लक्षणे लवकर शोधता आली तर तशा व्यक्तींना योग्य ते समुपदेशन आणि निदान करुन जवळच्या कोवीड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी लवकर पाठवणे शक्य होणार आहे. त्यासाठी आवश्यक साधने पुरवण्याची योजना अमलात आणण्यात येणार आहे.

प्राणवायूच्या पातळीमध्ये होणारी घट हे करोनाची लागण झाल्याचे प्राथमिक लक्षण आहे. म्हणून या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात ऑक्सीमीटरच्या माध्यमातून या पातळीवर लक्ष ठेवले जाणार असून ताप, सर्दीची लक्षणे असलेल्यांचीही जागेवरच तपासणी होणार आहे.

ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ‘आशा’’ कार्यकर्त्यांंना या पल्स ऑक्सीमीटरची खरेदी करुन द्यावा, असा आदेश जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ग्रामविकास विभागाने दिला आहे. आशा, शिक्षक, अंगणवाडीसेविका तसेच ग्राम कृतिदलातील सदस्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील लोकांची प्राणवायू पातळी तपासून, ती कमी असलेल्या व्यक्तींना पुढील तपासणी व उपचारांसाठी आरोग्य केंद्रात पाठवणे अपेक्षित आहे.

ग्रामपंचायतींनी स्व:निधीतून किंवा शिल्लक असलेल्या चौदाव्या वित्तच्या निधीतून खरेदी करावयाची आहेत. तसेच त्याचा वापर आपत्कालीन परिस्थितीत करावा आणि याबाबतचा अहवाल गट विकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हापरिषद प्रशासनाला कळवायचा आहे, असेही या संदर्भात कळवण्यात आले आहे.