25 February 2021

News Flash

विरारमध्ये बाहुला-बाहुलीचा लग्न सोहळा

गावकीचा एकोपा आणि जुन्या परंपरांना उजाळा

गावकीचा एकोपा आणि जुन्या परंपरांना उजाळा

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : जुन्या परंपरा आणि त्यानिमित्ताने एकत्र येणारे गावकरी.. त्यातून निर्माण होणारे ऋणानुबंध हे चित्र आता पाहावयास मिळत नाही. मात्र, विरार पूर्वेच्या चांदीप गावातील काही परंपराप्रेमींनी बाहुला-बाहुलीच्या लग्नाच्या निमित्ताने ही वीण पुन्हा जुळवून आणली.

विरार पूर्वेच्या चांदीप गावात बाहुला-बाहुलीचा लग्न सोहळा पार पडला. या लग्नामध्ये वऱ्हाडी, वांजत्री, पुरोहित, लग्न सोहळ्याचा साजशृंगार, वाजतगाजत वरातीसह अक्षताही पडल्या. मकर संक्रातीच्या नंतर बाहुला-बाहुलीचे लग्न करण्याची पारंपरिक प्रथा गावात नव्याने सुरू करण्यात आली आहे.

गावातील लग्न सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी पूर्वी वसईच्या ग्रामीण भागात बाहुला-बाहुलीचे लग्न लावण्याची प्रथा होती. लग्नाच्या मंगल कार्यासाठी आपापसातील भेद विसरून सर्वानी एकत्र यावे, या उद्देशांनी हा उत्सव भरवला जात होता. चांदीप गावातील माजी सरपंच एकनाथ किणी व समाजसेविका भारती वझे यांनी या प्रथेची सुरुवात केली होती. सोहळ्यानंतर इतर सर्व गावातील लग्न सोहळे सुरू  होतात.

समाजात निर्माण झालेला दुरावा, हेवेदावे सर्व विसरून पुन्हा आनंदाने राहता यावे यासाठी हा उपक्रम साजरा केला जात असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. धूमधडाक्यात साजऱ्या झालेल्या या उत्सवासाठी येथील स्थानिक आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, माजी नगरसेविका जयश्री किणी, अंजली पाटील आदी मान्यवरांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर झालेल्या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या.

बँडच्या तालावर वाजतगाजत वरात

चांदीप गावात गावकऱ्यांनी एकत्र येऊन बाहुला-बाहुलीच्या लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. या लग्न सोहळ्यात चांदीप गावातील डोंगरपाडा येथून पारंपरिक वस्त्र परिधान करून बँडच्या तालावर वाजतगाजत वरातही काढण्यात आली होती. चांदीप गावातील महिला वधू झालेली बाहुली नवरीच्या वस्त्रात तयारी करून वराची वाट पाहत होते. वरात मांडवात पोहोचताच भटजींनी मंगलाष्टकांच्या गजरात बाहुला-बहुलीचे लग्न लावले. या वेळी नवरामुलाकडून आलेले वऱ्हाडी व मुलीकडचे अशा दोघांनी आपल्या हातातील अक्षता वधू-वरावर टाकल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 2:28 am

Web Title: village unite and revive the old traditions zws 70
Next Stories
1 आमदारांच्या पीएच्या नावाने दबावतंत्र
2 शहरबात : पालघर शहर २२ वर्षांनंतर विकासाच्या दिशेने
3 शाळांची मनमानी सुरूच
Just Now!
X