भीषण पाणीटंचाई जाणवत असलेल्या शहापूर तालुक्यातील वेहळोली ग्रामपंचायत हद्दीतील सात-आठ वाडय़ांमधील ग्रामस्थांनी चार ते पाच दिवस पाण्याचा टँकर येत नसल्याने शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागावर धडक दिली. वेहळोली ग्रामपंचायत हद्दीतील खंडुचीवाडी, कृष्णाचीवाडी, चिंचवाडी, आंब्याचीवाडी, मुंडोलवाडी, घरटन व काटीचीवाडी या वाडय़ांसाठी २००५-०६ या वर्षी सुरू करण्यात आलेली पाणी योजना अर्धवट स्थितीत असल्याने त्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या वाडय़ांवर मार्चअखेरपासून लोकसंख्येनुसार एक ते दोन दिवसाआड पाण्याचा टँकर पाठविण्यात येत असल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात चार ते पाच दिवसांनी पाण्याचा टँकर येत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. खंडुचीवाडी येथील विहिरीत टँकरद्वारे सोडण्यात येणारे पाणी घरटन व मुंडोलवाडी येथील ग्रामस्थही याच विहिरीवर पाणी भरण्यास येत असल्याने अवघ्या तासाभरातच पाणी संपते. त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल सुरूअसून दररोज पाण्याचा टँकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी यावेळी केली. दररोज पाण्याचा टँकर न आल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.