आषाढी पौर्णिमेच्या दिवशी स्मशानभूमीत पूजा करून जादूटोणा केल्याचा आरोप करत संतप्त गावकऱ्यांनी शंकर पिंपळकर (४५) या ग्रामस्थाची भरचौकात लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने ठेचून हत्या केली. चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी या गावात ही मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. बल्लारपूर पोलिसांनी याप्ररकणी पाच जणांना अटक केली आहे. मात्र या अटकेला विरोध करून ५०० गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यातच बस्तान मांडल्याने तणाव निर्माण झाला आहे.
बल्लारपूर या तालुक्यातील बामणी गावात राहणारा शंकर जादूटोणा करतो, असा परिसरातील लोकांचा समज होता. बामणी गावात पसरलेली आजाराची साथ शंकरच्या जादूटोण्यामुळेच आहे, असेही गावकऱ्यांना वाटत होते. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून गावकऱ्यांचे त्याच्यावर लक्ष होते. शनिवारी आषाढी पौेर्णिमा असल्याने तो जादूटोणा करून कोणता तरी विधी करेल, अशी गावकऱ्यांना कल्पना होती. त्यामुळे काही तरुण सकाळपासूनच त्याच्या पाळतीवर होते.
आषाढी पौर्णिमेच्या रात्री शंकर एका महिलेसह स्मशानघाटाजवळील रस्त्याच्या कडेला अघोरी विधी करीत असल्याचे काही तरुणांना दिसून आले. हा प्रकार बघून संतप्त तरुणांनी दोघांना पकडून बेदम मारहाण सुरू केली. या दोघांनाही मारहाण करत गावातील मुख्य चौकात आणले. भरचौकात दोघांना केलेल्या बेदम मारहाणीत शंकरचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. राकेश बहुरिया, धर्मराज बहुरिया, सुनील बहुरिया व राजू चव्हाण यांच्यासह आणखी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी या अटकेला विरोध केला असून पाचही तरुणांना मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली. त्यासाठी ५०० ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यातच बस्तान मांडले.
आंध्र प्रदेशातून मांत्रिक
शंकर पिंपळकरने केलेला जादूटोणा निष्फळ ठरावा यासाठी गावकऱ्यांनी आंध्र प्रदेशातून एका मांत्रिकाला पाचारण केले आहे. त्याला मानधन देण्यासाठी प्रत्येकी ३०० रुपये गावकऱ्यांनी गोळा केले. मात्र आता या मांत्रिकालाही अटक करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे.