सात तालुक्यांतील १४० गावांत नक्षलवाद्यांना प्रवेशबंदी

नक्षलवाद्यांच्या शहिद सप्ताहाला ग्रामस्थांनी प्रथमच इतक्या तीव्रपणे विरोध केल्याचे चित्र येथे पाहायला मिळत असून सात तालुक्यांतील १४० गावांनी नक्षलवाद्यांना कायम गावबंदी केली आहे. याचाच अर्थ नक्षलवाद्यांचा हिंसाचार आता ग्रामस्थांना नकोसा झाल्यानेच शस्त्रे परत करून हा उठावाचा बिगुल ग्रामस्थांनी फुंकला आहे.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

छत्तीसगड, तेलंगण या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या गडचिरोली जिल्हय़ात १९८० च्या दशकात तेंदूपत्ता मजुरीचा मुद्दा व आदिवासींवरील अत्याचार रोखणे या दोन प्रमुख उद्देशांतून येथे नक्षल चळवळ फुलली. ३७ वर्षांपासून गडचिरोलीत नक्षलवादी चळवळ सक्रिय आहे. नक्षलवादच या जिल्हय़ाच्या विकासाला तसेच आदिवासींच्या उत्थानाला खऱ्या अर्थाने मारक ठरला आहे. ही बाब स्थानिक आदिवासींच्या लक्षात आली असून आता आदिवासींनीच नक्षलवाद्यांविरुध्द उठाव केल्याचे चित्र नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहात पाहायला मिळत आहे.

२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करावा, असे आवाहन नक्षलवादी नेत्यांनी केले होते. गेल्या महिन्याभरापासून नक्षली नेते यासाठी गडचिरोलीचे जंगल पिंजून काढत ठिकठिकाणी भित्तीपत्रके, फलक लावून ग्रामस्थांना सहभागी होण्यास सांगत होते. सरकार नाही तर आम्हीच तुमचे तारणहार आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, यावेळी ग्रामस्थांनीच नक्षलवाद्यांचे फलक जाळून त्याची होळी केली. नक्षलवाद्यांनी ३७ वषार्ंत आम्हाला हिंसाचार, हत्या, अत्याचार, खंडणीखोरी, मारहाण, जाळपोळ याशिवाय काहीच दिले नाही. तेव्हा आम्ही नक्षलवादाचा निषेध करतो असे म्हणून ग्रामस्थांनीच नक्षलवाद्यांना गावबंदी करून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. गृह खात्याच्या नोंदीनुसार आज गडचिरोलीत नक्षलवादाच्या दृष्टीने सहा तालुके संवेदनशील व सहा तालुके अतिसंवेदनशील आहेत. परंतु, नक्षल सप्ताहात गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांचे पुतळे जाळले. त्यांनी लावलेल्या फलकांचीही होळी करून बिगुल फुंकला आहे.

आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या बंदने काय साध्य झाले, आम्ही नक्षलवाद्यांचा बंद पाळून आमचा विकास का थांबवायचा, असा परखड सवाल करीत गावकऱ्यांनी एकत्र येऊन नक्षलवाद्यांविरुध्द आवाज उठवला आहे. जे नक्षलवादी आपल्या आदिवासी बांधवांची हत्या करतात, जे आपल्या भागाच्या विकासाला विरोध करतात, अशा नक्षलवाद्यांच्या बंदला आता आम्ही प्रतिसाद देणार नाही, असे आदिवासी दुर्गम भागातील गावकऱ्यांनी एकजुटीने ठरवून नक्षल सप्ताह न पाळण्याचा निर्धार केला. धानोरा, एटापल्ली, अहेरी, भामरागड व सिरोंचा या तालुक्यांतील बहुसंख्य नक्षलग्रस्त गावांतील ग्रामस्थांनी स्वत:कडच्या बंदुका व शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन करून लोकशाहीवर विश्वास दाखविला आहे. ज्या मरकेगाव भागात २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी हिंसा घडवून १५ पोलिस जवानांची हत्या केली त्याच भागात आता सामान्य आदिवासींकडून नक्षलवाद्यांचा विरोध होत आहे. आमच्यासारख्या इतर गावकऱ्यांनीही नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्याचे समर्थन न करता एकजुटीने नक्षलवाद्यांविरुध्द आवाज उठवून बंद न पाळण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले.

एटापल्ली तालुक्यातील कसनसूर मार्गावर चंद्रखंडी देवस्थान मंदिराजवळ पोलिस दल व नक्षलवादी संघटनांकडून परस्पर विरोधी फलक लावून एकमेकांच्या कार्याचा निषेध नोंदवत जनतेला आवाहन केले आहे. शहीद सप्ताहात नक्षलवादी चळवळ स्थापनेपासून विविध घटनेत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दुर्गम भागातील जंगल परिसरात स्मारके उभारून श्रध्दांजली कार्यक्रम घेतला जातो. तसेच दुर्गम भागातील वाहतूक विस्कळीत होत असून, नक्षली लक्ष्य ठरलेले राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी पोलिस तसेच सामान्य नागरिकातील संशयित पोलिस खबरी अशा व्यक्तींची हत्या करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून केला जातो. मात्र, पोलीस यंत्रणा सतर्क असून नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. पोलिसही फलक लावून नक्षलवाद्यांकडून आदिवासींवर होणारे अन्याय, अत्याचार, पिळवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे यासाठी दक्ष आहे.

एटापल्ली तालुक्यातील गट्टा, हेडरी, बुर्गी, आलदंडी, हालेवारा, कसनसूर, कोटमी, जाराबंडी या गावात नक्षली बॅनरची होळी करण्यात आली. पेंढरी भागातील दोरगट्टा, दुर्गापूर मार्गावर दोरगट्टा, मासानदी, रूपिनटोला, हटझर, खरगी, संभलपूर, पळसगाव, दुर्गापूर येथील गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांचा पुतळा व नक्षल समर्थकांनी लावलेले बॅनर जाळून नक्षल सप्ताह न पाळण्याचा निर्धार करत निषेध नोंदवला. या गावकऱ्यांनी एकत्र येऊन नक्षलवाद्यांच्या चातगाव एलओएस कमांडर जोगन्नाचा प्रतिकात्मक पुतळा सामूहिकरित्या जाळून एकप्रकारे नक्षल सप्ताहाचा विरोध करीत नक्षलवाद्यांना चपराक लगावली. शहीद सप्ताहातच ७ तालुक्यांतील १४० गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा निर्णय ग्रामसभा घेऊन केलेला आहे. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील सर्वाधिक ५० गावांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ चामोर्शी २०, एटापल्ली १९, आरमोरी १७, कोरची १७, अहेरी १६ व मूलचेरा एक या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांना प्रत्येकी तीन लाख प्रमाणे निधी वितरित करण्यात आलेला आहे. विशेष नक्षल गावबंदीचे नवीन प्रस्ताव गोळा केले जात आहे. आता या सर्व गावांचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख राज्य शासनाकडे पाठविणार आहे. त्यानंतर या सर्व गावांना विकास कामांसाठी विशेष निधी देण्यात येणार आहे.

सर्वाधिक नक्षलग्रस्त एटापल्ली, कोरची, अहेरी या तीन तालुक्यांतील ५२ गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केलेली आहे. मात्र नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या धानोरा, सिरोंचा या तालुक्यातील एकाही गावाने नक्षलवाद्यांना गावबंदी केलेली नाही.तर मुलचेरा तालुक्यातील केवळ एका गावाचा त्यात समावेश आहे.

  • शहीद सप्ताहात पोलिसांनी सात दिवसांत नक्षलवाद्यांनी जंगलात तयार केलेली किमान २५ ते ३० स्मारके उद्ध्वस्त केली आहेत.
  • नक्षलवाद्यांना जंगलाच्या बाहेर पडू न देण्यात गडचिरोली पोलिस व राज्य राखीव दलाच्या कमांडरला यश आले आहे.
  • पोलिसांच्या प्रभावामुळे नक्षलवाद्यांना यावेळी गावात स्मारके उभारता आलेली नाही. त्यामुळेच नक्षलवाद्यांनी जंगलात स्मारके उभारली आहेत.
  • शहीद सप्ताह व त्या पूर्वीपासून जिल्हा पोलिस दलाने नक्षलग्रस्त क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गावात शस्त्र जमा करण्याची मोहिम अतिशय प्रभावीपणे राबविली.
  • त्याचाच परिणाम यावेळी भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, धानोरा या तालुक्यांतील बहुसंख्य गावातील लोकांनी त्यांच्याकडच्या बंदुका व शस्त्रे पोलिसांकडे जमा केली.
  • केवळ शस्त्रेच सोपविली नाही तर शपथ घेऊन आम्ही यानंतर नक्षलवाद्यांना मदत करणार नाही असे जाहीर आश्वासनही दिले.

शस्त्र जमा करण्याच्या मोहिमेसोबतच जिल्हा पोलिस दलाने आत्मसमर्पण योजनाही अतिशय प्रभावीपणे राबविली. त्याचाच परिणाम शहीद सप्ताहाच्या काही दिवस आधी पाच जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यापूर्वी छत्तीसगड व महाराष्ट्रात सक्रिय सहा नक्षलवाद्यांनी पोलिसांकडे शस्त्रे सोपवून चळवळीला रामराम ठोकला.

शहीद सप्ताहात नक्षलवाद्यांनी चंद्रपूरचे चांदा फोर्ट, मूल व नागभीड अशी तीन रेल्वे स्थानके उडविण्याची धमकी दिली होती. त्या पाश्र्वभूमीवर चंद्रपूर व गडचिरोलीत कडक पोलिस बंदोबस्त तैनात करतानाच चंद्रपूर येथे संचलन करण्यात आले. यावेळी नक्षलवाद्यांचे बॉम्बस्फोटाचे प्रयत्न कशा पध्दतीने उधळून लावायचे तसेच अशा परिस्थितीला कशा पध्दतीने हाताळायचे याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

नक्षलवाद्यांच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ समोर येत नाहीत, विरोधात बोलणे तर सोडाच, घरातून बाहेरसुध्दा पडत नाहीत. परंतु, यावेळी प्रथमच शहिद सप्ताहात लोक स्वत:हून नक्षलवाद्यांच्या विरोधात घराबाहेर पडले, बॅनर, पोस्टरची होळी करीत नक्षलवाद्यांचे पुतळे जाळले, हा एक सकारात्मक बदल येथे प्रथमच बघायला मिळाला आहे. यावर्षी १४० गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केलेली आहे. या सर्व गावांना प्रत्येकी तीन लाखाप्रमाणे निधीचे वितरण करण्यात आलेले आहे. नक्षलवाद्यांना गावबंदी करणाऱ्या नवीन गावांचे प्रस्ताव गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्या गावांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली.