संपूर्ण कर्जमाफीसाठी गावकऱ्यांचे आंदोलन

हिंगोली : संपूर्ण कर्जमाफी, सरासरी उत्पन्नाच्या अटीमुळे न मिळालेला पीक विमा आणि वीजप्रश्नी सेनगाव तालुक्यातील ताकतोडा व हाताळा या दोन गावांनी ‘आमचे गाव विकत घ्या’ असे म्हणत गावातच उपोषणाला सुरुवात केली आहे. गुरुवारपासून उपोषणाला बसलेल्या गावकऱ्यांनी मुलांनाही शाळेत पाठविलेले नाही.

या गावांसाठीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत व्यवस्थापक नसल्याने किती जणांना कर्जमाफी मिळाली हे समजत नव्हते. त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचे वेगळेच पाऊल उचलले. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्दय़ांचे निरसन करणे जिल्हा प्रशासनाला शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ताकतोडा या गावातील अनेकांना पीक विमा मिळाला नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. या गावातील गेल्या पाच वर्षांतील पिकांची उत्पादकता लक्षात घेता काही जणांना त्याचा लाभ होणार नाही, असे नियम असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. काही ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असल्याचे सांगण्यात येते. मात्र, दुष्काळ जाहीर झाला असतानाही अन्य पिकांना पीक विमा का नाही, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी केलेले प्रयत्न बुधवारी अयशस्वी ठरले.  गावकरी संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘गाव विकत घ्या’ अशी मागणी करत उपोषणास बसले आहेत. या दोन्ही गावातील शाळाही बंद आहेत. जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनात ५०० गावकरी सहभागी झाले आहेत.