अमरावती जिल्ह्यातील माहुली जहागीरमध्ये एसटीच्या मागच्या चाकाखाली १२ वर्षांचा मुलगा चिरडला गेल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी एसटी जाळली. या घटनेनंतर माहुली जहागीरसह आसपासच्या गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे एसटीची आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाच्या बंबालाही काही जणांनी आग लावली. सध्या संपूर्ण गावात पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. दरम्यान, दंगेखोरांना रोखताना राज्य राखीव पोलीस दलाच्या काही पोलीसांनी तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यावरही सौम्य लाठीमार केला. पोलीसांनी याबद्दल माहिती दिली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माहुली जहागीरहून एसटीची बस मंगळवारी सकाळी अमरावतीकडे निघाली होती. त्यावेळी १२ वर्षांचा एक मुलगा एसटीमध्ये चढत असतानाच वाहकाने घंटा वाजवली. त्यामुळे चालकाने बस पुढे नेण्यास सुरुवात केली. याचवेळी तो मुलगा बसमधून खाली पडला आणि मागच्या चाकाखाली चिरडला गेला. यामध्ये जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावातील लोकांनी एसटी उलटवली आणि ती पेटवून दिली. त्यानंतर तिथे आलेला अग्निशामक दलाचा बंबही पेटवून देण्यात आला.
घटनेची माहिती मिळाल्यावर अमरावती ग्रामीणचे पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी घटनास्थळी रवाना झाली. घटनास्थळावरून लोकांना मागे हटविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. पोलीस घटनास्थळी असतानाच आमदार यशोमती ठाकूर यादेखील तिथे हजर झाल्या. त्यावेळी जमावाने त्यांच्या दिशेने धाव घेतली. याच जमावावर पोलीसांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी यशोमती ठाकूर यांच्यावरही सौम्य लाठीमार करण्यात आला. यशोमती ठाकूर यांनीच आपल्यावरही लाठीमार करण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान, या घटनेनंतर एसटीचा चालक आणि वाहक दोघेही फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
(संग्रहित छायाचित्र)