बिबटय़ाच्या तावडीतील शेतक-यास पाळीव कुत्र्यांनी वाचवल्याच्या घटनेचा आज तिसरा दिवसही कराड तालुक्यातील बांदेकरवाडी-सवादे पंचक्रोशी भीतीच्या सावटाखालीच असून, बिबटय़ाची ही दहशत गुरेराख्यांसाठी कमालीच्या चिंतेची समस्या होऊन बसली आहे. काल या बिबटय़ाने बांदेकरवाडी परिसरात धुमाकूळ घालून या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची ‘डोळा नाय डोळय़ाला, बिबटय़ा आलाय वस्तीला’ अशीच दयनीय स्थिती करून सोडली आहे. या बिबटय़ाला पकडण्याची मागणी गावक -यांमधून होत आहे.
बांदेकरवाडीलगतच्या शिंदेद-या या डोंगरी भागात शेळय़ा चरवण्यासाठी गेलेल्या महादेव बांदेकर यांच्यावर गुरुवारी बिबटय़ाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, बिबटय़ा व पाळीव कुत्र्यातील हल्ला व प्रतिहल्ल्यातील एका जखमी कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. कुत्र्यांच्या कळपाने बिबटय़ाला लक्ष्य करून त्याला पिटाळून लावले असलेतरी या बिबटय़ाची दहशत सवादे, म्हासोली, बांदेकरवाडी, शेवाळेवाडी, घोगाव, येळगावसह परिसरात कायम असून, हा बिबटय़ा वारंवार दिसत असल्याच्या चर्चेने शिंदेद-यातील शेळय़ा, मेंढय़ांसह गुरे चरवण्यास गुरेराखे धजवत नसून, परिणामी या पशुधनाची पोटासाठी परवड होत आहे. बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झालेले महादेव बांदेकर यांच्यावर उंडाळे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी त्यांची भेट घेऊन वन खात्याला बिबटय़ाच्या बंदोबस्तासाठी सूचना दिल्या आहेत.
गुरुवारी सकाळी ९ वाजता बांदेकरवाडीच्या डोंगरात प्रकटलेल्या बिबटय़ाने या विभागात प्रथम दर्शन दिले. त्याला हुसकावण्यासाठी ग्रामस्थ व अन्य नागरिकांनी डोंगराकडे गर्दी केली. मात्र, यातच बिबटय़ाने लोकांवर हल्ला केला. यात बघ्यांपैकी अतिउत्साही महादेव बांदेकर गंभीर जखमी झाले. बिबटय़ाने केलेला हल्ला या विभागातील लोकांनी पहिला होता, त्यामुळे ग्रामस्थ या हल्ल्याची एकच चर्चा करीत असताना बिबटय़ाचे दर्शन झाल्याच्या वावडय़ांनी सवादे, म्हासोली, बांदेकरवाडी, शेवाळेवाडी, घोगाव, येळगावसह परिसरात या बिबटय़ाची चांगली दहशत पसरली आहे. हा बिबटय़ा डोंगरात निघून गेला असला तरी तो पुन्हा उसात लपल्याचे ग्रामस्थ बोलतात. त्यामुळे शेतात जाण्यास कोणी धजवत नाही. इतकेच काय पण डोंगरात दररोज शेळय़ा व जनावरे चारण्यास जाणारी गुराखी मंडळीही आता या बाजूकडे फिरकली नाहीत. बांदेकरवाडी गाव डोंगरकपारीत असल्याने ग्रामस्थांनी आपली जनावरे सुरक्षित बांधून आपली झोप सावध ठेवली आहे.