गावकऱ्यांकडून शेतकरी कुटुंबाच्या शेतात भातलावणी

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : करोनाच्या धास्तीमुळे समाजातील माणुसकी हरवत चालल्याचे अनेक घटनांमधून दिसून आले आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील बेलोशी ग्राव यास अपवाद ठरले आहेत. करोनाच्या आपत्तींत त्यांनी आपले समाजभान कायम राखले आहे. एका करोनाबाधित शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी गावकरी धावून आले आहेत. गावकऱ्यांनी एकत्र येऊ न त्या शेतकऱ्याच्या शेतात भात लावणी केली आहे. आणि इतरांसमोर नवा आदर्श घालून दिला आहे.

अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथे एका शेतकऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला. त्याची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शेतकरी कुटुंब मोठे संकटात सापडले. घरात आणि शेतात काम करायला, कोणी मदतगार नाही, अशा भाताच्या तयार रोपवाटीकेचे काय होणार? हा प्रश्न या

कुटुंबासमोर होता. ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी एकत्र येऊन करोनाबाधित कुटुंबाची मदत करण्याचा निर्णय घेतला.

गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या शेताची नांगरणी केली, एवढेच नव्हे तर भात रोपांची संपूर्ण शेतात लावणी करून दिली. यासाठी कुठलाही मोबदला त्यांनी घेतला नाही. केवळ माणुसकीच्या भावनेतून ग्रामस्थांनी या कुटुंबाला ही मदत केली आहे.

एकीकडे राज्यभरात करोनाबाधितांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीच्या बातम्या दिवसागणिक समोर येत आहेत. नात्यातील व्यक्तींनीही बाधित कुटुंबाची साथ सोडल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईतून गावाकडे येणाऱ्यांवर करोनाच्या भितीने निर्बंध घातले जात आहेत. अशा परिस्थितीत बेलोशी ग्रामस्थांनी करोना बाधित कुटुंबाची मदत करून माणूसकीचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. कोकणातील इतर गावकऱ्यांनी यातून बोध घेणे गरजेचे आहे.

‘ या कुटुंबातील तिघांनाही करोनाची लागण झाली होती. यातील एकाचा मृत्यू झाला. त्यांच्या शेतात काम करण्यासाठी कोणी नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या शेतातील लावणी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आणि तो पुर्णही केला. करोनाच्या महामारीत माणुसकीचा झरा जिवंत राहायला हवा, त्याचा प्रयत्न गावकरी करीत आहेत.’

– अशोक धर्मा वारगे, स्थानिक ग्रामस्थ