पाण्यासाठी अनेकदा टँकरची मागणी करूनही सरकारने प्रत्यक्षात दुर्लक्षच केल्याने चिडलेल्या ग्रामस्थांनी सरपंच-उपसरपंच व ग्रामसेवक यांना तब्बल ५ तास डांबून ठेवले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या मध्यस्थीने पाण्यावर तोडगा निघाल्यानंतर या तिघांची सुटका झाली.
औसा तालुक्यातील तांबरवाडी येथे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. राजेवाडी व तांबरवाडी यांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. सत्ताधारी व विरोधकांत येथे सतत वाद सुरू असतो. तांबरवाडी येथे तीनपैकी एका बोअरला पाणी येते. ३ हजार लोकवस्तीचे हे गाव आहे. काहींनी गावात मुबलक पाणी असल्याने टँकरची गरज नाही, असे कळवले.
गावात पाण्याची वितरण व्यवस्था सुरळीत नसल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांना कळविले. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीला वेगळेच वळण लागले. सरपंच राजेंद्र बिराजदार, उपसरपंच ज्ञानदेव माडजे व ग्रामसेवक राजकुमार तोडकर यांना ग्रामस्थांनी कोंडून ठेवले.
घटनेचे गांभीर्य ओळखून किल्लारी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अशोक अनंत्रे सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकास ५ तास कोंडल्यानंतर तहसीलदार आल्याशिवाय कुलूप काढणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. अखेर यावर मार्ग काढण्याची हमी दिल्यानंतरच दुपारी चारच्या सुमारास या तिघांची सुटका झाली.
उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब थोरात, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन उपलब्ध पाणीपुरवठय़ाची पाहणी केली. पाण्यासाठी राजकारण करू नका, असा सल्ला ग्रामस्थांना अप्पासाहेब थोरात यांनी दिला. गावच्या पाणीपुरवठय़ासाठी अधिग्रहणाने पाणीपुरवठा करण्याचे आदेशही या वेळी देण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2013 3:24 am