दगडखाणींतील उत्खननाला ग्रामस्थांचा विरोध

पालघर : पावसाळा संपल्यानंतर दगड खदानींतून उत्खनन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. अशा खदानीमुळे नागरी वस्तीत नुकसान होत असल्याने या  कामांना जिल्ह्यात अनेक ठिकाणी विरोध होत आहे. पालघर तालुक्यातील सफाळे विठ्ठलवाडी तसेच विक्रमगड तालुक्यातील बोरांडा लेलेपाडा येथील स्थानिकांनी अशा खदानींना परवानगी दिल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे.

नागरी वस्तीपासून दगड उत्खनन करण्याची मर्यादा राज्य शासनाने आखून दिली आहे. त्याचे पालन न करता नागरी वस्तीलगतच्या जमिनीत स्फोट घडवून दगड काढण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी खोलीची मर्यादा पाळली जात नाही. जिलेटिन कांडय़ांच्या साह्य़ाने दगडात स्फोट घडवल्यानंतर लगतच्या रहिवासी वसाहतींना त्याचे हादरे जाणवतात. स्फोटात दगडाचे बारीक तुकडे दूरवर उडतात.याशिवाय भिंतींना तडे जातात. भूजल पातळीवर त्याचा परिणाम होतो. याविरोधात ग्रामस्थांनी वारंवार आवाज उठवला आहे.

पालघर तालुक्यातील सफाळा मांडे-विठ्ठलवाडी परिसरात गुरचरण जमिनीतील दोन खदानींना शासनाने याआधी बंद केले होते. मात्र, त्यानंतर बंद केलेली खदानी पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या खदानींना पर्यावरण विभागाची परवानगी नाही. जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ पातळीवर तक्रार अर्ज देण्यात आले आहेत. विक्रमगड तालुक्यातील बोरांडा लेलेपाडा या भागात बंद असलेल्या खदानीत साठणाऱ्या पाण्यामधून स्थानिक ग्रामस्थ भाजीपाला लागवड करत आहेत. त्यामुळे त्यांचे रोजगारासाठी स्थलांतर बंद होऊन भाजीपाला लागवडीने परिसरातील नागरिकाला उत्पन्नाचे साधन मिळले आहे. काही मंडळीनी जागा मालकाला हाताशी धरून या खदानीला पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू केले. खदानी मध्ये साठविलेले पाणी उपसून टाकण्यास प्रारंभ केल्याने या कृतीला स्थानिकांनी विरोध केला आहे. तसेच याप्रकरणी तहसीलदारांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. नागरी वस्तीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेली खदान गेल्या वर्षी तहसीलदार यांनी बंद करण्याचे आदेश दिले होते.

प्रशासन सुस्त

अशाच प्रकारे पालघर तालुक्यात नागझरी, लालोंडे, गुंदले, नागझरी, किराट, निहे, गिरनोळी, महागाव, दुर्वेस तसेच तलासरी तालुक्यात उधवा इत्यादी गावांमध्ये गैरमार्गाने दगड उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत असून त्याकडे शासकीय अधिकाऱ्यांचे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप होत आहेत. या बाबत पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता खदानीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याविषयी खातरजमा करण्यासाठी पथक पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.