राज्यभरात विविध ठिकाणी गावबंदी ; शहरांतून येणाऱ्यांची अडवणूक

सध्या विषाणू प्रसाराच्या भीतीने शहरांतील लोक सुरक्षितता आणि घरी बसून येणाऱ्या कंटाळ्यावर उतारा म्हणून मुंबई, पुण्यातून खासगी वाहनाने आपल्या हक्काच्या गावाकडे निघाले असले तरी त्यांना आपल्याच गावात आपण परके असल्याचा अनुभव येत आहे. काही ठिकाणी गावकऱ्यांनी गावाच्या सीमा अडवून धरल्या आहेत, तर काही गावांनी शहरांतून गावात येऊ नका असे फलक लावले आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत बंदचे आवाहन केले आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. त्यापाठोपाठ जिल्हा बंदची घोषणा करीत राज्यातील सर्व जिल्हय़ांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागात देखील बघायला मिळत असून बाहेर जिल्हय़ातील किंवा अनोळखी इसम गावात येऊ नये म्हणून आता गावातील रस्ते बंद करून गावबंदी करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्हयातील राजुरा येथे रस्त्याच्या मुख्य मार्गावर पाईप टाकून मोठे बॅनर लावून १४ एप्रिलपर्यंत बाहेरच्या व्यक्तीला गावबंदी जाहीर केली आहे. तीच बाब गोंडपिंपरी गावात सुद्धा बघायला मिळत आहे. तिथेही ग्रामस्थांनी एकत्र येत गावबंदी केली आहे.

अडीच हजार रुपये दंड

गोंदिया जिल्ह्य़ातील गावकऱ्यांनी गावबंदीचा आदेश काढून गावाच्या सीमा बंद केल्या आहेत.  या गावातील नागरिकांनी गावाच्या सीमेवरील रस्त्यावर झाडे कापून ठेवली आहे. गावात कुणी बाहेरून न विचारता आला तर अडीच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकणात मुंबईकरांचा धसका

कोकणातील गावकऱ्यांनी मुंबईकरांचा धसका घेतला आहे. गावागावात सध्या प्रवेश बंदीचे बोर्ड लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोकणातील लाखो लोक मुंबईत कामानिमित्ताने स्थायिक आहेत. शिमगा आणि गणेशोत्सवाला हे लोक कोकणात दाखल होत असतात. तेव्हा त्यांच्या आगमनाची गावकरी आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र आता हेच मुंबईकर गावकऱ्यांना नकोसे झाले आहेत.

शेतघर असूनही..

ठाणे जिल्ह्यतील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील काही गावांच्या वेशी ग्रामस्थांनी बंद केल्या आहेत. तसेच सेकंड होम म्हणून घेतलेल्या शेतघरांकडे जाणारे रस्तेही बंद केले आहेत.

ग्रामस्थांचा पुढाकार

बीड जिल्ह्य़ात गावात कोणी येऊ  नये आणि गावातून कोणी बाहेरही जाऊ  नये यासाठी ग्रामस्थांनी गावच्या सीमा चारही बाजूंनी बंद केल्या आहेत. गावात येणाऱ्या रस्त्यांवर दगड, गोटे आणि काटेरी झुडपे टाकून ती अडवण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या पुढाकाराने काही दंडुकेधारी व्यक्तीही तैनात करण्यात आल्या आहेत.