तणावपूर्ण शांततेत आज रत्नागिरी येथे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार विनायक राऊत विजयी झाल्याचे घोषित करण्यात आल्यावर सिंधुदुर्गात फटाक्यांची आतषबाजी झाली. सर्वत्रच पेढे, लाडूसारखी मिठाई वाटप करण्यात आली.
इतके सावंतवाडीत राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला.
नारायण राणे पिता-पुत्राविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील जनतेने मतदान केले. मोदी लाट होती, पण त्याहीपेक्षा राणे पिता-पुत्राविरोधात मतदानाची लढाई करून पराभूत करण्याचा संदेश आज जनतेने खरा करून दाखविला.
प्रा. मधु दंडवते, केंद्रीय माजी मंत्री सुरेश प्रभु व ब्रिग्रेडीअर सुधीर सावंत यांचा पराभव पाहता या वेळचा डॉ. नीलेश राणे यांचा हा धक्कादायक पराभव सिंधुदुर्गला वाटतो. जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पक्ष, या सर्वानी राणे पिता-पुत्राला विरोध केला, त्याहीपेक्षा ३० प्रकल्पांतील विरोधकांनीही यावेळी राणेविरोधी आवाज केला होता.
शिवसेना महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांना सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून मिळालेले मताधिक्य पाहता राणेना जनतेने नाकारल्याचे उघड होईल.
काँग्रेस आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघाने ४२ हजारपेक्षा जास्त मताधिक्य राऊत यांना देऊन काँग्रेसला धक्का दिला आहे.
प्रा. मधु दंडवते यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न साकारूनही त्यांचा कोकणातील जनतेने पराभव केला होता.
त्यावरून कोकणातील जनता परिवर्तनवादी आहे, हे उघड झाले होते. त्यातून उद्योगमंत्री नारायण राणे यांनी धडा घेतला नाही. त्यामुळेच त्यांचे सुपुत्र डॉ. नीलेश राणे यांना पराभवाचा धक्का मिळाला असे राजकीय विश्लेषक बोलताना सांगतात.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार असे नेते सिंधुदुर्गात प्रचाराला आले.
त्यामानाने शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वगळता कोणीही स्टार प्रचारक नव्हते पण राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार दीपक केसरकर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, माजी आमदार शंकर कांबळी, सुरेश दळवी, कुलदीप पेडणेकर असे जिल्ह्य़ात काम करणारे राष्ट्रवादीचे नेते राणे यांच्या विरोधात उभे राहिले म्हणजे तेच खरे स्टार प्रचारक मानले जात आहेत.
विनायक राऊत यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, जुने काही काँग्रेसवाले, विविध प्रकल्प विरोधकांनी आनंद व्यक्त केला.
त्यातच राणे पिता-पुत्राच्या पराभवाचे गणित दडले आहे. राणेंना गाफील ठेवणाऱ्या काँग्रेस स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा मात्र या निवडणुकीत फुटला आहे.
शिवसेना महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. आम. केसरकर यांच्या विचारांना साथ देणारे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते.
आमदार दीपक केसरकर व त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांना चुकीची वाटली होती, पण लोकसभा मतदारसंघातील जनतेने तिला पाठिंबा दिल्याचे चित्र आज उभे राहिले. त्यामुळे दीपक केसरकर व सहकारी आनंदात होते.
शिवसेना महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा विजय महायुतीपुरता मर्यादित नव्हता तो विजय जिल्ह्य़ातील तमाम जनतेच्या विविध घटकांचा विजय आहे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिवसभर उमटल्या आहेत.