तावडे यांचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर प्रतिहल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५६ इंची छातीच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत ५६ पक्ष व संघटना एकत्र आले असले तरी मोदी यांच्यापुढे त्यांचा टीकाव लागणार नाही, असे भाजपचे नेते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते यांचे कोणी ऐकत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने तुमच्यावर का विश्वास ठेवावा, असा सवालही तावडे यांनी केला. भ्रष्टकारभाराचा आदर्श ठेवणाऱ्या अशोक चव्हाण यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचे धाडस कोठून येते, असा चिमटाही त्यांनी काढला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस इतके जातीपातीचे राजकारण कोणी केले नाही, हे अजित पवार यांनाही ठाऊक आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शरद पवार यांना चोरांचा राजा म्हणणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी हे आता महाआघाडीत पवारांच्या मांडीला मांडी लावून का बसले आहेत, असा टोलाही तावडे यांनी लगावला.