एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणतात की पक्षात त्यांचे कोणीही ऐकत नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार जे बोलतात ते करतच नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे नेते आहेत त्यांचा स्वतःवरच विश्वास नाही मग महाराष्ट्राने त्यांचं का ऐकावं असा प्रश्न आहे अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. विरोधक अशा स्थितीत असताना जे एकमुखाने बोलतात आणि करून दाखवतात अशा भाजपा सेना महायुतीसोबतच राज्यातील मतदार राहिल असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाआघाडीची पत्रकार परिषद झाली त्यातूनच कळलं की ५६ इंच छाती असलेल्या नेत्याविरोधात ५६ पक्ष आणि संघटना एकत्र आल्या आहेत. पण असं झालं तरीही महाआघाडीचा राज्यात कुठेही टिकाव कुठेही लागणार नाही असेही तावडे यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण म्हणतात त्यांचं कोणी ऐकत नाहीत. विखे पाटील म्हणतात त्यांचं कोणी ऐकत नाहीत. शरद पवार जे बोलतात ते करतच नाहीत. त्यांनी सांगितले की, पार्थ लढणार नाही पण तो आता लढत आहे. त्यांनी सांगितले की, माढा मतदारसंघात ते लढतील आता लढणार नाहीत. त्यांनी सांगितले की, पुलवामा घटनेचा बदला घेण्यासाठीचा हल्ला त्यांच्याच सल्ल्याने झाला आणि आता ते म्हणतात की, ते सांगितलंच नव्हतं. काँग्रेसच्या अशोक चव्हाणचं कोणी ऐकत नाहीत. विखेचं कोणी ऐकत नाहीत, पवार जे बोलतात ते करत नाहीत मग महाराष्ट्रांनी याचं का ऐकावं हा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या मतदारासमोर नक्की उभा आहे. अशोक चव्हाणांना त्यांची माणसंही सांभाळता येत नाहीत असाही टोला तावडेंनी लगावला.