गेल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्रामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करुन महाराष्ट्राला अक्षरशः भिकेला लावायचे काम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी केली. महाराष्ट्राची लाज घालवणाऱया आघाडी सरकारमधील मंत्र्यांना घरी बसवा, असे आवाहनही तावडे यांनी केले.
पंकजा मुंडे यांच्या दुसऱ्या टप्यातील ‘पुन्हा संघर्ष यात्रे’चा प्रारंभ चाळीसगाव येथून विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना तावडे यांनी काँग्रेस-आघाडी सरकारवर टिकेची झोड उठविली. ते म्हणाले, गेल्या १५ वर्षांच्या काळात काँग्रेस आघाडी सरकारने ११ लाख ८८ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला, परंतु हा भ्रष्टाचार झालाच नाही, अशी टिमकी अजित पवार वाजवत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बिल्डरांना अधिक एफएसआय देऊन लाखो रुपयांचा घोटाळा केला. उद्योगधंद्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी भाजपकडून लवकरच गावागावात प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची विकासाची गंगा आता महाराष्ट्रात आणायची आहे, त्यासाठी सर्वांनी एकजूटीने काम करुन काँग्रेस आघाडी सरकारला सत्तेवरुन खाली खेचा आणि महायुतीला सत्तेवर आणा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात केले.