‘स्वाईन फ्लू’ या संसर्गजन्य आजाराने संपूर्ण राज्यातच थैमान घातले असताना त्यावर काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत किंवा केल्या जात आहेत, याचे कोणतेही शास्त्रोक्त उत्तर न देता वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी टोलवाटोलवी केली. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला कोणताही दिलासा मिळाला नाही, उलट संभ्रमाचीच स्थिती निर्माण झाली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (मेडिकल) आयोजित स्वाईन फ्लू आजाराबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सामान्य नागरिकांनीच जागरुक राहून या आजारावर नियंत्रण आणावे असे सांगितले. यापूर्वी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेडिकलमध्ये आणखी व्हेंटिलेटर देऊ, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचीच री ओढत आणखी येत्या दहा दिवसात दहा व्हेंटिलेटर देण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी चिकन गुनियाची साथ आली. त्यानंतर डेंग्यू आणि आता स्वाईन फ्लूचा उद्रेक झाला आहे. अशा साथीमध्ये सापडलेल्या नागरिकांवर उपचार व्हावे, यासाठी मेडिकलमध्ये एक स्वतंत्र वॉर्ड तयार केला जाईल, कायमस्वरुपी प्रयोगशाळा निर्माण केली जाईल तसेच एक व्यवस्थापन समिती स्थापन करून त्याची बैठक मुंबईत घेतली जाईल, पैशांची कमतरता भासू देणार नाही, या आश्वासनांचा पाऊसही त्यांनी यावेळी पाडला.
स्वाईन फ्लूवरील टॅमी फ्लू औषधांचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी मंत्री म्हणून आपण काय करणार, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळून शासनाकडे खूप औषधे असल्याचे त्यांनी सांगितले. खोकला, पडसे, झाल्यानंतर लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. आजार बळावल्यानंतर खासगी रुग्णालयात जातात. तेथे बराच वेळ निघून जातो. शेवटच्या टप्प्यात असताना शासकीय रुग्णालयात येतात आणि मृत्युमुखी पडतात. असे रुग्ण आधीच शासकीय रुग्णालयात आले, तर त्यांच्या वाचण्याची शक्यता अधिक असते. स्वाईन फ्लू तपासणीचा अहवाल आल्याशिवाय या आजारावरील उपचारास सुरुवात करता येत नाही. परंतु असे लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात रुग्णाला दाखल करून त्याच्यावर औषधोपचार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मेडिकलमध्ये दाखल रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीचे अहवाल तीन-चार दिवस मिळत नाहीत.
त्यामुळे उपचार कसे करावे, असा प्रश्न डॉक्टरांसमोर उपस्थित होत असताना, मंत्र्यांनी मात्र हा प्रश्न डॉक्टरांवर ढकलून आपली सुटका करून घेतली. दुसरीकडे खाटांची संख्या कमी असल्याकडे लक्ष वेधले असता आणखी खाटांची व्यवस्था केली जाईल व नमुन्यांच्या तपासणीसाठी मेडिकलमध्ये प्रयोगशाळा तयार केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे, वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सचिव मेधा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.