शिक्षणात ‘थ्री इडिएट’ चित्रपटातील ‘चतुर’सारखे विद्यार्थी न घडवता ‘रांचो’ उभे केले पाहिजेत. ते काम शिक्षण विभाग करते आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम वांग्चुक अशा तज्ज्ञ मंडळींना घेऊन आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आगामी काळात या बोर्डाला विशेष महत्त्व प्राप्त होईल, अशी योजना आखल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. विद्यार्थ्यांकडून घोकंपट्टी करून घेऊन त्यांची खोटी गुणवत्ता सांगणारी शिक्षणपद्धती बंद करून कौशल्य शोधून ते विकसित करणारे शिक्षण महाराष्ट्रात दिले जाईल, असेही ते म्हणाले.

राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या (स्वायत्त) दुसऱ्या पदवीदान समारंभप्रसंगी ते बोलत होते. शिक्षणात केलेल्या बदलाबद्दल सांगताना तावडे म्हणाले, दहावी, बारावीची फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा पुढच्या वर्षांत संधी देण्याचा प्रयोग आपण यशस्वी केला. जूनमध्ये निकाल लागल्यानंतर जुलमध्ये परीक्षा घेऊन ऑगस्टमध्ये निकाल लावून ३५ हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तरीही जे अनुत्तीर्ण राहिले त्यांना प्रशिक्षण देऊन कौशल्य विकासाची संधी दिली व त्यांच्यावरील नापासाचा शिक्का पुसला. दहावीच्या निकालानंतर १४ नापास विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची समस्या समजावून घेऊन आपण हा बदल केला असल्याचे ते म्हणाले.

खेळाडूंना नोकरीत पाच टक्के आरक्षण

राज्यस्तरीय स्पर्धेत खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीत पाच टक्के आरक्षण, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवणाऱ्यांना थेट नोकऱ्या दिल्या जातील. खेळाच्या बाबतीत हा निर्णय घेतला गेला. खेळाडूंना प्रशिक्षण देणे सुरू केले व यातून या वर्षीच्या खेलो इंडियात महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिला आला असल्याचे तावडे म्हणाले.

इंग्रजी शाळेतून ३४ हजार विद्यार्थी मराठीत

पदवीदान समारंभात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सध्याच्या सरकारचा अच्छे दिन सरकार असा उल्लेख केला. तो धागा पकडून शिक्षणमंत्र्यांनी या सरकारने शिक्षणात केलेल्या बदलाची माहिती दिली. गेल्या तीन वर्षांत ३४ हजार इंग्रजी शाळेतील मुलांनी मराठी शाळेत प्रवेश घेतला. ‘असर’ संस्थेने दिलेल्या अहवालात शिक्षणात महाराष्ट्रातील शाळांमध्ये गुणवत्ता वाढली असल्याचे म्हटले आहे. हेच अच्छे दिन, असा टोलाही तावडे यांनी लगावला.