साहित्य संमेलनात इंग्रजी साहित्यातील ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना न बोलावले गेल्याने महाराष्ट्राचे नाक कापले गेल्याचे मत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले आहे. यवतमाळच्या साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाला कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही हे सांगणे सरकारचे काम नसते. नयनतारा सहगल वादाशी सरकारचे काहीही घेणेदेणे नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.

नयनतारा सहगल वादात मुख्यमंत्र्यांचं नाव गोवलं जाणं गैर आहे. सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेण्याचा साहित्य महामंडळाचा निर्णय सरकारलाही पटला नाही. या निर्यामुळे महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं अशी तिखट प्रतिक्रिया तावडे यांनी त्यांच्या भाषणात नोंदवली आहे. एवढंच नाही तर मराठी भाषेच्या संवर्धनसाठी हे सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचंही विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. सगळ्या शाळांना चौथीच्या वर्गापर्यंत मराठीची सक्ती करण्यात आली आहे. हा नियम ज्या शाळा डावलतील त्यांच्यावर कारवाई होईल असाही इशारा तावडे यांनी दिला.

दरम्यान तावडे बोलत असताना साहित्य संमेलनात काही जणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेले सदस्य आणि पोलीस यांनी या गोंधळी लोकांना वेळीच आवरलं असंही समजतं आहे.