22 July 2019

News Flash

फलकबाजीने आचारसंहितेचे उल्लंघन

वसई-विरार शहरात अनेक ठिकाणी विविध पक्षांचे बॅनर लावलेल्या स्थितीत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

वसई, विरार शहरात राजकीय पक्षांकडून विविध ठिकाणी जाहिरात फलक

निवडणुकीच्या जाहीर होऊन आचारसंहिता लागल्याने राजकीय पक्षांना जाहिराती करणे कठीण होत आहे. तरीदेखील वसई-विरारमध्ये काही ठिकाणी राजकीय पक्षांचे बॅनर लावले असल्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. पालिकेची कारवाई होत असली तरी याकडे लक्ष जात नसल्याने राजकीय पक्षाचे फावले आहे.

लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याचे जाहीर करून सर्वत्र आचारसंहिता लावण्यात आली. आचारसंहितेच्या कळात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा राजकीय पक्षांना त्रासदायी ठरू शकतो हे माहीत असतानादेखील नालासोपारा व विरार पूर्वेला काही ठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. आचारसंहिता लागल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपापले बॅनर काढून टाकले व भिंतीवर असलेल्या त्यांच्या जाहिरातींचे चित्रदेखील मिटवले.

वसई-विरार शहरात अनेक ठिकाणी विविध पक्षांचे बॅनर लावलेल्या स्थितीत असून काही ठिकाणी तर पक्षाच्या, नगरसेवकाच्या कार्यालयावरील बॅनर पण जसे होते तसेच आहेत. अचोले रोड, कारगिल नगर, संतोष भुवन, इत्यादी ठिकाणी अजूनही बॅनरबाजी सुरू असून, प्रशासनाचे याकडे लक्ष जात नसल्याने राजकीय पक्षांचे फावले आहे. फक्त विरोधीच नाही तर सत्ताधारी पक्षदेखील बेधडकपणे बॅनर करत असल्याने आचारसंहितेचा अपमान होत असल्याचे दिसत आहे.

भाईंदरमध्येही तक्रार

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी विकासकामांची उद्घाटने करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु भाजपने मात्र या गोष्टीचा इन्कार केला आहे. सायंकाळी आचारसंहिता घोषित होण्याआधीच विकास कामांची उद्घाटने केली असल्याचा दावा भाजपने केला आहे.

रविवारी १० मार्चला सायंकाळी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम घोषित केला. त्याच वेळी आचारसंहिता लागू झाली असल्याचे आयोगाने घोषित केले होते. मात्र असे असतानाही भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध विकास कामांची उद्घाटने केली तसेच त्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर पोस्ट केली अशी तक्रार कृष्णा गुप्ता यांनी केली आहे.

परंतु भाजपकडून या गोष्टींचा इन्कार करण्यात आला आहे. सायंकाळी आचारसंहिता घोषित होण्याआधीच विकास कामांची उद्घाटने उरकण्यात आली होती त्यामुळे या तक्रारींमध्ये काहीच तथ्य नसल्याचा खुलासा भाजपचे वरिष्ठ नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती धृवकिशोर पाटील यांनी केला आहे. उद्घाटन कार्यक्रमांविषयी मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडे चौकशी केली असता विकास कामांच्या   उद्घाटनांचा कोणताही कार्यक्रम महापालिकेकडून आयोजित करण्यात आला नव्हता असा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला.

First Published on March 15, 2019 12:29 am

Web Title: violation of code of conduct in virar