विजयवल्लभ रुग्णालयात नियमांचे उल्लंघन;  कागदोपत्री अग्निपरीक्षण

विरार : जानेवारी महिन्यात भंडारा येथील रुग्णालयात आग लागून काही बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वसई-विरार महापालिकेने शहरातील सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विरारमधील विजयवल्लभ या रुग्णालयाने खासगी कंपनीकडून परीक्षण करून घेतले. मात्र, प्रत्यक्षात या रुग्णालयात अग्निसुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे शुक्रवारी पहाटे झालेल्या दुर्घटनेने दाखवून दिले.

विरार येथील विजयवल्लभ रुग्णालय हे २०१५ साली उभारण्यात आले होते. जानेवारी महिन्यात महापालिकेने सर्व रुग्णालयांना अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विजय वल्लभ या रुग्णालयाने खासगी कंपनीकडून अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केले होते. मात्र शुक्रवारी लागलेल्या आगीनंतर अग्निसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयात आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी वेगळा मार्ग असणे आवश्यक होते. मात्र या रुग्णालयात जे प्रवेशद्वार होते तोच आपत्कालीन मार्ग होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत अभियंत्याने पाहणी करून विद्युत यंत्रणा योग्य असल्याचा अहवाल देणे गरजेचे असते. त्यानंतर पालिकेने अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र द्यायचे असते. मात्र वातानुकूलित यंत्रणा सदोष असल्याचे आगीच्या निमित्ताने उघड झाल्याचा आरोप भाजपचे नेते मनोज पाटील यांनी केला आहे.

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनीदेखील रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इमारतीत आपत्कालीन परिस्थितीत मोकळी जागा (रेफ्युजी स्पेस) असणे आवश्यक असते. मात्र या रुग्णालयात अशा प्रकारची जागा नसल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीमध्ये या गोष्टी समोर येतील, असेही त्यांनी सांगितले.

पालिकेची सारवासारव

आम्ही सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार अग्निसुरक्षा लेखापरीक्षण सुरू होते, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांनी सांगितले. पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांनी विजय वल्लभ रुग्णालयाचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण झाल्याचे सांगितले; परंतु नेमके निकष काय, इतर रुग्णालयांची काय स्थिती आहे, याबाबत ते माहिती देऊ शकले नाही.