अजब बंगला या नावाने प्रसिद्ध मध्य भारतातील एकमेव ब्रिटिशकालीन मध्यवर्ती संग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या ट्रॉफीजच्या परस्पर लावलेल्या विल्हेवाटीसंदर्भात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी चौकशीचे आदेश दिले खरे, पण हे चौकशीचे पत्रच मुळात चौकशी अधिकाऱ्यांना मिळाले नाही. मात्र, त्या पत्राची एक प्रत नागपूर वनविभागाच्या उपवनसंरक्षकांना मिळाल्याने त्यांनी संग्रहालयाकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती मागितली आहे.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२चे उल्लंघन करीत नागपुरातील अजब बंगला येथील वन्यप्राण्यांच्या ट्रॉफिजची विल्हेवाट लावल्याचे प्रकरण लोकसत्ताने उघडकीस आणले. सोबतच या संग्रहालयाकडे असलेल्या ट्रॉफिजचे मालकी प्रमाणपत्रसुद्धा नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले. संबंधित वृत्त प्रकाशित होताच वनविभागात खळबळ उडाली. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (निसर्ग पर्यटन व वन्यजीव प्रशासन) शेषराव पाटील यांनी तातडीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि ३० जूनपर्यंत अहवाल सादर करावा, असे पत्र २७ जूनला काढले. मात्र, नागपूर विभागाचे (प्रादेशिक) मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभूर्णीकर यांना ३० जूनपर्यंत हे पत्रच मिळालेले नव्हते. त्याचवेळी उपवनसंरक्षक पी.के. महाजन यांना हे पत्र ३० जूनला मिळाले. त्यामुळे त्यांनी आज तातडीने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची सुत्रे हलविण्यास सुरुवात केली. संग्रहालयात कोणत्या वन्यजीव ट्रॉफीज आहेत आणि त्या कुठून आणलेल्या आहेत, त्या कधीपासून आहेत, याची यादी वनविभागाला सादर करावी. या ट्रॉफीजच्या मालकी प्रमाणपत्राच्या प्रती वनविभागाला सादर कराव्या. ज्या ट्रॉफी नष्ट केल्या त्याची यादी आणि कोणाच्या आदेशाने नष्ट केल्या, त्या आदेशाच्या प्रतिसह संपूर्ण कागदपत्रे व माहिती येत्या ५ जुलैपर्यंत सादर करावी, अशा आशयाचे पत्र आज संग्रहालयाकडे रवाना करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.