28 February 2021

News Flash

‘सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार उसळला’

कोरेगावची बदनामी प्रसारमाध्यमांनी थांबवली पाहिजे

भीमा कोरेगाव येथील ग्रामस्थांची पत्रकार परिषद

महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार उसळला असा आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे. भीमा कोरेगावात राहणाऱ्या लोकांमध्ये ऐक्य टिकून आहे. गावातले सगळे लोक एकत्र आहेत आमच्यात कोणताही जातीभेद नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली आहे. तसेच ३१ डिसेंबरला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी येऊन शौर्य स्तंभाची पाहणी केली होती. तसेच त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्रीही आले होते. शौर्य स्तंभाचे २०० वे वर्ष आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार हे सगळ्यांना ठाऊक होते. तरीही या ठिकाणी पुरेशी पोलिसांची कुमक तसेच पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला नाही.

देशभरातून ५ लाखांपेक्षा जास्त बांधव या ठिकाणी येणार होते याची दखल घेऊन सुरक्षेची आवश्यक व्यवस्था करणे प्रशासनाचे काम होते मात्र प्रशासनाने ते केले नाही. सरकारनेही त्याकडे दुर्लक्ष केले त्याचमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला असा आरोप डॉक्टर वर्षा शिवले यांनी यावेळी केला. तसेच देशभरातल्या दलित आणि मराठा बांधवांना त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आमच्या गावात राहणाऱ्या लोकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. काही समाजकंटकांमुळे आणि चिथावणीखोर लोकांमुळे आमच्या गावाची नाहक बदनामी झाली असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेमागे जे लोक आहेत त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, त्यात जाती धर्मावरून भांडत बसणे योग्य नाही. ज्या लोकांनी हा हिंसाचार घडवून आणला त्यांना प्रशासनाने त्वरित शोधावे आणि कठोर कारवाई केली पाहिजे. बाहेरच्या लोकांनीच आमच्या गावाची शांतता बिघडवली. २०० व्या वर्षीच असे का घडले? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रकरणात आम्ही कोणाचेही नाव घेणार नाही मात्र जे दोषी त्यांना लवकरात लवकर अटक केली जावी, तसेच गावातल्या निरपराध मुलांना काही गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात आले आहे त्यांची सुटका करण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 11:45 am

Web Title: violence in bhima koregaon was caused due to inadequate neglect of the government
Next Stories
1 भीमा कोरेगावची नाहक बदनामी केली जाते आहे ; ग्रामस्थांचा आरोप
2 राज्य गारठले
3 माझ्यावरील आरोप निराधार – भिडे गुरुजी
Just Now!
X