मराठवाडय़ातील वार्ताहरांकडून, औरंगाबाद

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शुक्रवारी मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ांत बंद, मोर्चे आणि निषेधाचा आवाज अधिक उंचावण्यात आला. हिंगोली जिल्ह्य़ातील कळमनुरी येथे बसची तोडफोड करण्यात आली, तर बीड आणि परभणी या जिल्ह्य़ांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या. औरंगाबादमधील मोर्चात सहभागी झालेली गर्दी एवढी होती, की जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी मोर्चा पोहोचल्यानंतर अक्षरश: पाय ठेवायलाही जागा नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणा देत तरुणाईने आजादीची मागणी तालासुरात व्यक्त केली.

हिंगोली जिल्ह्य़ात कळमनुरीत येथे शुक्रवारी बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी आठच्या सुमारास कळमनुरी आगारातून ग्रामीण भागात जाणाऱ्या चार एसटी बसची तोडफोड करण्यात आली. यामधील एक बस जाळण्याचा प्रयत्न झाला. दुपारी दोननंतर रस्ता रोको झाला. त्या वेळी आंदोलकांनी दगडफेक केली असता पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने यांच्या छातीला दगड लागल्याने ते जखमी झाले. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी अश्रुधुराचे नळकांडे फोडले. दरम्यान, शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालय जाळण्याचाही प्रयत्न झाला. हिंगोलीत येणाऱ्या बसची शहरातच अज्ञात मंडळीकडून तोडफोड झाली. कळमनुरी, हिंगोलीत या घटना घडल्यानंतर महामंडळाने संपूर्ण बस वाहतूक बंद केली. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार कळमनुरीत आपल्या ताफ्यासह ठाण मांडून बसले आहेत. बस वाहतूक बंद झाल्याने विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय झाली. बसची तोडफोड करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध कळमनुरी व हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

बीड शहरात नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी दुपापर्यंत शांततेत बंद पाळण्यात आला. मात्र, दुपारनंतर जमावाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसगाडय़ांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनीही सौम्य लाठीहल्ला करत जमावाला पांगवले. या वेळी अश्रुधुराच्या नळकांडय़ाही फोडल्या. शहरात तणावाची परिस्थिती असून पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना शांततेचे आवाहन केले. दुपारी तीन वाजता कारंजा, राजुरी वेस, बशीरगंज चौक या भागात एकत्र आलेल्या जमावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली. गटागटाने आलेल्या जमावाला शांतता राखण्याचे आवाहन पोलीस आणि प्रतिष्ठित नागरिकांकडून करण्यात येत असताना काही जणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जात रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनावर (एमएच२३-एफ ५१७२) दगडफेक केली. समोरील भागाच्या काचा फोडल्यानंतर जमाव आक्रमक झाला. त्याचवेळी बसस्थानकाकडून येणारी बस (एमएच२०-बीएल२६७९) या गाडीच्या दिशेनेही दगडफेक झाली. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनीही सौम्य लाठीमार करून अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. बशीरगंज चौकातही गर्दीला हटवण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. जमावाच्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य दोघे जण जखमी झाले.

परभणीतही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ईदगाह मैदान येथून सुरू झालेला मोर्चा शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर अचानक रेल्वेस्थानक परिसरातील दुकानांवर व वाहनांवर प्रचंड दगडफेकीस सुरुवात झाल्याने हिंसक वळण लागले. रेल्वे स्टेशन रोडवर जमावाने काही ठिकाणी दुचाकी वाहने उलटून दिली तर काही ठिकाणी चारचाकी वाहनांवर दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांनी सौम्य स्वरूपाचा लाठीमार करून ही गर्दी पांगवली. या वेळी मोठय़ा  प्रमाणावर पळापळ झाली. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांनी मात्र वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती लवकर आटोक्यात आली आणि सायंकाळी जनजीवन पूर्ववत झाले. दरम्यान, या मोर्चामुळे सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता.

औरंगाबाद शहरातील आजाद चौकातून मोठय़ा संख्येने या कायद्याच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन केले. एमआयएमचे नेते खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मोर्चाला ‘महामोर्चा’चे स्वरूप होते. विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत तोबा गर्दी होती. अगदी गल्लीबोळातून युवक ‘हमें चाहिये आजादी’ असे म्हणत आंदोलनात सहभागी झाले होते. मुस्लीम महिलांचाही आंदोलनात मोठा सहभाग होता.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शुक्रवारी रोजी नांदेडात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. ‘मोदी सरकार हाय हाय, लेके रहेंगे इन्साफ’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला व वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन असल्यामुळे गांधी पुतळा व शिवाजी पुतळा परिसरात पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत मोर्चा काढला.

जालना येथे गुरुवारी या कायद्याच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. फळे व भाजीपाला असोसिएशनने दोन दिवस बाजारपेठ बंद राहणार असल्याचे कळविले होते. डाव्या पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

लातूर शहरातील काही भागांत आज दुकाने बंद ठेवून कायद्यातील दुरुस्तीचा विरोध करण्यात आला. २३ डिसेंबर रोजी लातूर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद येथे गुरुवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.

कळमनुरीत हिंसक वळण

कळमनुरी येथे चार बसची तोडफोड, दगडफेक व पोस्ट ऑफिस जाळण्याचा प्रयत्न झाला. दगडफेकीत उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने छातीवर दगड लागल्याने जखमी झाले. कळमनुरीतील या घटना घडत असताना, हिंगोली शहरात सकाळी औंढानागनाथवरून हिंगोलीला येणाऱ्या बसवर शंकरराव चव्हाण उर्दू हायस्कूलजवळ तीन दुचाकीवरून आलेल्या नऊ जणांनी बसवर (एमएच२०-बीएल३३५४) समोरून दगडफेक केल्याने बसच्या काचा फुटून नुकसान झाले.