News Flash

रायगड जिल्हय़ात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

आठ महिन्यांत १८ खून, ६४ महिलांवर बलात्कार वाढत्या नागरीकरण आणि औद्योगिकरणाबरोबर रायगड जिल्हय़ातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे विदारक चित्र उघडकीस आले आहे. गेल्या आठ महिन्यांत

आठ महिन्यांत १८ खून, ६४ महिलांवर बलात्कार
वाढत्या नागरीकरण आणि औद्योगिकरणाबरोबर रायगड जिल्हय़ातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे विदारक चित्र उघडकीस आले आहे. गेल्या आठ महिन्यांत रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या १८ खून आणि ६४ महिलांवर बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय चोऱ्या, घरफोडय़ा आणि दरोडय़ांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. पोलिसांच्या दृष्टीने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हे ताणतणावमुक्त जिल्हे म्हणून ओळखले जायचे. आता मात्र ही ओळख पुसली जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे कोकणातही आता गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्हय़ात महिलांवरील अत्याचार, चोरी, घरफोडय़ा आणि खून यांसारख्या गंभीर गुन्हय़ांच्या प्रमाणात गेल्या आठ महिन्यांत मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्हय़ाचे वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण ही बाब प्रशंसनीय वाटत असली तरी रायगडात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण ही जिल्हय़ाला कलंक लावणारी बाब आहे. जानेवारी ते ऑगस्ट या अवघ्या आठ महिन्यांत ६४ बलात्काराचे गुन्हे संबंधित पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. २०१४ मध्ये ही संख्या ४८ इतकी होती, तर रायगड पोलीस हद्दीत मागील वर्षी विनयभंगाचे ९९ गुन्हे दाखल झाले होते. या वर्षी आठ महिन्यांत विनयभंगाचे ७३ गुन्हे दाखल आहेत.
रायगड जिल्हय़ातील गुन्हय़ांसंदर्भात पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार खुनासारख्या गंभीर गुन्हय़ापासून अन्य गुन्हय़ांची संख्या १९४९ इतकी आहे. गतवर्षी ती २५२३ इतकी होती. २०१४ मध्ये खुनाचे ३१ गुन्हे दाखल होते. या आठ महिन्यांत खुनाचे १८ गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न झाल्याच्या घटना २४ झाल्या आहेत, तर सदोष मनुष्यवधाखाली ३ गुन्हे दाखल आहेत.
मागील वर्षी ६ दरोडे पडले, तर या आठ महिन्यांत ४ दरोडे पडल्याची नोंद आहे. ४१ एकूण जबरी चोरीच्या घटना घडल्या, तर १५३ घरफोडय़ा झाल्या आहेत. तर चोरीच्या ३७४ गुन्हय़ांची नोंद झाली आहे. गर्दी, मारामारीप्रकरणी १४२ गुन्हे नोंद आहेत, तर विश्वासघाताचे २४ गुन्हे दाखल आहेत. ११८ जणांची जिल्हय़ात फसवणूक झाली आहे. ४८ जणांना पळवून नेण्यात आले आहे.
याशिवाय २३४ दुखापतप्रकरणी गुन्हे दाखल आहेत, तर २२० प्राणांतिक अपघाताचे गुन्हे दाखल झाले आहेत. २५४ मोटार अपघात घडले आहेत व अन्य गुन्हे धरून हा गुन्हय़ांचा आकडा १९४९ इतका नोंद आहे. २०१५ संपायला अजून तीन महिन्यांचा अवधी आहे. या आकडेवारीत नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हय़ासाठी ही एक चिंतेची बाब आहे. विशेषत: महिला आणि अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार रोखण्याचे आव्हान पोलीस दलाला पेलावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 12:46 am

Web Title: violence increase in raigrah
टॅग : Increase
Next Stories
1 संजय दत्तची शिक्षा माफीची मागणी राज्यपालांनी फेटाळली
2 ‘सत्तुऱ्या’चा अर्जुन झाला, ‘डेंग्या’चा राघव!
3 महापालिका बरखास्त करायला लावतो- सुशीलकुमार शिंदे
Just Now!
X