राज्यातील दलितांवरील अत्याचार गतवर्षीपेक्षा कमी झाल्याचा गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा दावा फसवा आहे. दलितांवरील अत्याचार वाढत चालले असून ते रोखण्यासाठी राज्य शासनाने भरीव स्वरूपाच्या उपाययोजना करून कृतिशील पाऊल टाकावे, यासाठी लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेणार आहोत. तसेच दलितांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी २ जून रोजी आर.पी.आय. आठवले गटाच्या युवा आघाडीच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार रामदास आठवले यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, दलितांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी व शाहू महाराज यांच्या पुरोगामी तत्त्वाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला दलितांवरील अत्याचाराच्या घटना शोभणाऱ्या नाहीत असा उल्लेख करून आठवले यांनी पुरोगामी महाराष्ट्रातील दलितांवरील अत्याचाराचा पाढा वाचला. सन २०१३ मध्ये दलितांवरील अत्याचाराच्या १६८३ घटना झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. तर मार्च २०१४ पर्यंत अशाप्रकारच्या ४३८ घटना घडल्या असल्याचे गृहमंत्र्यांचे म्हणणे आहे. कागदोपत्री जरी घटनांचे प्रमाण कमी झाले असले तरी वास्तव मात्र वेगळी भयावह स्थिती मांडणारी आहे. याची दखल राज्य शासनाने गंभीरपणे घेण्याची गरज आहे. सामाजिक तेढ कमी होण्यासाठी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने प्रोत्साहनात्मक भूमिका सजगपणे बजावली पाहिजे. आंतरविवाह करणाऱ्या जोडप्यांना ५ लाख रुपये व नोकरी दिली पाहिजे असे उपक्रम राबवले तरच सामाजिक दरी कमी होण्यास मदत होईल.
योगगुरू रामदेवबाबा यांनी राहुल गांधींचा उल्लेख करून दलितांबद्दल केलेल्या अवमानकारक विधानाचा आठवले गटाने यापूर्वीच निषेध नोंदवला आहे असे नमूद करून आठवले म्हणाले, रामदेवबाबांचा एनडीएच्या आघाडीला पाठिंबा असला तरी त्यांच्या विधानाशी आम्ही कदापिही सहमत होणार नाही. त्यांच्या या विधानाबद्दल पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. तसेच खर्डा येथे दलित युवकांवर अत्याचार केलेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाविषयी आठवले यांनी एनडीएला बहुमत मिळणार आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असल्याने माझे मंत्रिपद निश्चित आहे असा विश्वासही व्यक्त केला. मंत्रिपद मिळाल्यानंतर दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांचे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे साहित्य घराबाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.