माजी विश्वस्तांचा आरोप

तालुक्यातील डेडरगाव तलावाच्या पायथ्याशी असलेल्या खानदेश विपश्यना ध्यान केंद्राचा ३० एकरचा भूखंड हडप करण्याचा डाव तत्कालीन जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने रचण्यात आला आहे. त्यासाठीच आपणास बेकायदेशीर ठराव करून केंद्राच्या विश्वस्त मंडळातून दूर करण्यात आले, असा आरोप मंडळाचे माजी विश्वस्त रवि देवांग यांनी केला आहे.
मोहाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात देवांग यांनी तक्रारही दाखल केली आहे. भूखंड हेराफेरीच्या आरोपाखाली संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी देवांग यांनी केली आहे. डेडरगाव तलावाजवळ विपश्यना ध्यान केंद्र आहे. १२ वर्षांपासून या केंद्राचे संस्थापक आणि तहहयात विश्वस्त म्हणून आपण काम सांभाळल्याचा उल्लेख देवांग यांनी निवेदनात केला आहे. १९९४ मध्ये खानदेश विपश्यना विश्वस्त मंडळाची नोंदणी झाली. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध कामे केली. दरम्यान, सहाय्यक आचार्य म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांनी विश्वस्तपदाचे काम थांबविले. देवांग यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत त्यांना सहाय्यक आचार्यपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. अध्यक्ष म्हणून आपल्याच नावे सर्व कागदपत्रे असल्याने विश्वस्तांनी आपणांस हटवून तत्कालीन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांना केंदप्रमुख आचार्य म्हणून नियुक्त केल्याचेही देवांग यांनी तक्रारीत नमूद केले आहे. यानंतर संस्थेच्या सात-बारा उताऱ्यावरून आणि इतर कागदपत्रातूनही आपले नाव कमी करण्यात आले. कोणतीही पूर्वकल्पना न देता बेकायदेशीरपणे आपली हकालपट्टी करण्यात आली. संस्थेच्या दस्तावेजात फेरफार करून सुमारे २० कोटीची ही खासगी, सार्वजनिक मालमत्ता हडप करण्यासाठीच हा डाव रचण्यात आल्याचा आरोप देवांग यांनी केला आहे. संस्थेची जमीन हक्कासंदर्भातील कागदपत्रे सील करून या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.