स्वरभास्कर भीमसेन जोशी यांच्या तिस-या पिढीतील नातवाने मिरजेच्या मीरासाहेब दग्र्यात गायनसेवा रुजू करीत आपल्या पिढीजात संगीतसेवेची मुहूर्तमेढ रोवली. संगीतरत्न अब्दुल करीमखाँ संगीत महोत्सवात पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी याने यमन राग सादर करून संगीत रसिकांची वाहवा मिळविली.
संगीत सभेच्या निमित्ताने संगीत रसिकांना तीन दिवसांची संगीत मेजवानी लाभली. खाँसाहेब ज्या चिंचेच्या झाडाखाली बसून गायन करायचे त्याच चिंचेच्या झाडाखाली त्यांच्या शिष्यांनी संगीतसेवा सादर केली. यंदा महोत्सवाचे ८०वे वर्ष होते. या संगीत सभेत किराणा घराण्याचे पं. भीमसेन जोशी यांनी आपली गायनसेवा पेश केली होती. या वेळच्या संगीत सभेत पंडितजींचे पुत्र श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी उपस्थित होते. श्रीनिवास जोशी यांनी अभोगी राग सादर केला. त्यांना तबल्यावर रमाकांत राऊत यांनी साथ केली.
वडिलांच्या गायनानंतर विराज गायनाला बसला. वयाला साजेसा स्वर त्याच्या यमन रागातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. पं. भीमसेन जोशी यांच्या हिंदी अभंगाने त्यांनी गायनाची सांगता केली. अर्धा तास त्याने गायन केले. त्याला तबल्यावर रमाकांत राऊत व संवादिनीवर संदीप गुरव यांनी साथ केली.
खाँसाहेबांच्या ‘जमुना के तीर’ या भरवीने संगीतमहोत्सवाची सांगता झाली. संयोजन बाळासाहेब मिरजकर, दर्गा सरपंच अब्दुल अजिज मुतवल्ली, मज्जीद सतारमेकर आदींनी केले.